- प्रतिनिधी, saptrang@esakal.com
माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील साहचर्य वाढले पाहिजे, अशा बाबी आवर्जून सांगितल्या जातात. विशेषतः शहरी भागात बिबट्या आणि अन्य हिंसक वन्यप्राणी आले, की त्याबद्दल अनेक गोष्टी चर्चिल्या जातात. वन्यप्राण्यांच्या जागेवर मानवाने अतिक्रमण केले आहे, असा सूर लावला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर ‘ एक झुंज वाघाशी ’ हे ओंकार वर्तले यांचे पुस्तक इतिहासाची काही दालने आपल्यासमोर उलगडते.
मुळात सध्याच्या काळात शिकारीला पूर्ण बंदी आहे. या पुस्तकात वाघाबरोबरच्या लढाईची जी कथा आहे ती शतकापूर्वीची आहे. गोडाजी नावाच्या एका शेतकऱ्याने गावात शिरून त्रास देणाऱ्या वाघाबरोबर कशी झुंज घेतली त्याची ही यशकथा आहे. या छोटेखानी कादंबरीत कुठेही शिकारीचे समर्थन केलेले नाही किंवा शिकारीचे उदात्तीकरण केलेले नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिकार केली जायची त्या काळातील ही कथा. नाशिक भागात घडलेल्या या कथेकडे आजचे मापदंड लावून पाहणे चुकीचे ठरेल.
एका नरभक्षक वाघाने आख्खे गाव भयभीत झाले होते. वाघ गावात कधीही येईल आणि कोणाला पळवेल, कोणाला मारेल याचा काही अंदाजच येत नव्हता. अशा परिस्थितीत गोडाजी नावाच्या एका सामान्य शेतकऱ्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने या वाघाला जेरबंद करण्याचा निश्चय केला. जंगलात रात्री जाऊन त्या वाघाला पकडण्याचा प्रयत्न केला.
विशेष बाब म्हणजे वाघाशी झुंज घेऊन या बहाद्दर तरुणाने वाघाला पकडून गावात आणले. मात्र गावात आणलेला हा वाघ बेशुद्ध होता त्यामुळे सारे गावकरी जमा झाले होते. अशातच शुद्धीवर आलेल्या या घायाळ वाघाने गावच्या पाटलालाच लक्ष्य केले. त्या वेळी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन गोडाजीने पाटलाचा आणि अन्य मंडळींचा जीव वाचविला.
या छोटेखानी कादंबरीत वर्तले यांनी गावगाडा कसा चालतो, अशिक्षित माणसे प्रसंगी जिवावर उदार होऊन गावासाठी किती दिव्य करतात याची प्रचिती येते. ही लोककथा ऐकून वर्तले यांनी त्याला कादंबरीचे रूप देताना कोणताही चमत्कार येथे घुसविलेला नाही किंवा अनिष्ट प्रथा किंवा राक्षसी उद्देशाने उत्तेजन दिलेले नाही.
गावातील एकोपा, एकमेकांबरोबरचे साहचर्य, गरिबी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि शतकापूर्वीचा काळ नेमकेपणाने कसा उभा राहील याची काळजी घेतली. ओघवती भाषा, व्यक्तिचित्रणातील ठोसपणा आणि प्रसंगांची नेमकी गुंफण यामुळे इतिहासाच्या पानात हरवून गेलेली ही लोककथा वाचकांचा नेमकेपणाने ठाव घेते.
पुस्तकाचं नाव : एक झुंज वाघाशी
लेखक : ओंकार वर्तले
प्रकाशक : नावीन्य प्रकाशन, पुणे (९८२२९३९४४६)
पृष्ठं : १२०
मूल्य : २०० रुपये