आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेच्या ठाणे आणि पुणे केंद्रांमध्ये सल्ला घ्यायला येणारे शुभार्थी (पेशंट्स-रुग्ण) आणि त्यांचे शुभंकर (अर्थात कुटुंबीय-स्नेही) ह्यांना भेटण्याचा सोहळा कधी आठ तास चालतो तर कधी दहा तास. तोही विना मध्यंतर. पिंडीवर टपटपणाऱ्या अभिषेकासारखा. ह्यालाच नेहमीच्या डॉक्टरी भाषेत म्हणतात पेशंट्सची ओपीडी काढणे.
ओपीडी शब्दाचा अर्थ ‘आउट पेशंट्स डिपार्टमेंट.’ पण डॉक्टरच्या पेशंट्स तपासण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच ओपीडी हे नाव पडले आहे. व्यावसायिक म्हणून डॉक्टरला हे काम जमायला हवेच पण आपापल्या ज्ञानशाखेचे अभ्यासक होणे महत्त्वाचे. डॉक्टर, वकील, सीए ह्यांच्या व्यवसायांना ‘प्रॅक्टिस’ म्हणतात, म्हणजेच निरंतर स्वाध्याय.
पहिल्या टप्प्यावर पुस्तके-परीक्षा, मग निरीक्षण-अवलोकन, त्यानंतर रुग्णानुभव, सहाध्यायी अनुभव, त्यावरचे चिंतन. असा प्रवास असेल तर एका कालखंडानंतर सरावाचं रूपांतर साधनेत होतं. हे कसं ओळखावं?... अकृत्रिम सहजतेमधून. आपल्याला ‘उमगण्याआधी’ आपल्या शाखेचा शास्त्रार्थ ‘आपोआप’ उमटतो तेव्हा. इथे अभ्यासकाचा उपासक बनतो. विनोबा म्हणतात, गणित आवडणाऱ्याचा ईश्वर म्हणजे गणितच.
ईश्वर म्हणजे काय तर मोक्षप्राप्ती. विनोबांच्याच व्याख्येनुसार, ‘मोहाचा क्षय’ म्हणजे मोक्ष. मोहात कोण पडतो तर संकुचित देहबुद्धीत अडकलेला ‘मी.’ जर विज्ञानाबरोबरच्या वाटचालीत हा ‘मी’ विरघळला आणि माझ्या माध्यमातून माझ्या शास्त्राची अनुभवसिद्ध अभिव्यक्ती होत राहिली की आलाच मोक्षाचा क्षण. अशा अनेक कणांनी तर अद्वैत अनुभवायचे. शास्त्रचर्चेमध्ये नव्हे.
माझा ज्येष्ठ सर्जन मित्र विचारत होता, 'अद्वैताचा अनुभव कुठे मिळेल?' मी म्हणालो, 'कुठे नाही मिळणार तेच शोधावे लागेल. सर्जरी करताना तुझे आयुध म्हणजे इन्स्ट्रमेंट, तुझी बोटे, त्या मागची बुद्धी आणि भावना एकात्म झाली की अद्वैताचा अनुभव. द्वैत आणि अद्वैताचा खेळ अनुभवायचा फक्त.
ताटामध्ये वाढलेले अन्नप्रकार म्हणजे द्वैत. पोटामधले अन्न म्हणजे अद्वैताची प्रक्रिया सुरू. अन्नाचे रूपांतर ऊर्जेत होणे म्हणजे एकात्मतेचा अनुभव. म्हणूनच तर म्हणायचे अन्नब्रह्म. तीच गाथा सुरांची. एखाद्या मैफिलीमध्ये गायक, वादक ह्यांचा आविष्कार, त्यांची वाद्ये, त्यांची शरीरे यातून जे शिल्प जिवंत होते ते असते नादब्रह्म.”
सहजतेकडून एकात्मतेकडे जाणारा कोणताही व्यावसायिक अद्वैताच्या पायरीवर असतो. पुनपुन्हा मध्ये येत राहतो तो ‘मी’पणाचा अडसर. कसा ते पाहू या, माझ्याच अनुभवातून. तर ओपीडीमध्ये येणाऱ्या एखाद्या रुग्णाला खूप चांगला फरक पडला तर तो खुल्या मनाने कृतज्ञता व्यक्त करतो. “डॉक्टर, तुम्ही नसता तर हे शक्य झालेच नसते,” असे म्हणतो.
ह्याच अर्थाची अनेक वाक्ये बोलतात आमचे शुभार्थी. चेहऱ्यावर आदरभाव दाटलेला असतो, आपलेपणाची लाट उसळलेली असते. अशावेळी हात जोडून त्या शुभार्थी, शुभंकरांना आदरपूर्वक वंदन करत मी ‘धन्यवाद’ म्हणून त्या शुभवचनांचा स्वीकार करतो आणि तत्काळ त्या फुलांचा प्रसाद माझ्या विज्ञानाच्या ईश्वरापर्यंत मनोमन पोहोचवतो. “जे झाले ते माझ्या माध्यमातून झालेल्या मदतीमुळे.
पण त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे' संधी मिळाली तर माझी भूमिका स्पष्ट करतो. किती गंमत असते पाहा. विज्ञानातला ईश्वर उपचार करतो, शुभार्थीच्या मनातले ईशतत्त्व त्याला साथ देते. काय असते ते तत्त्व? विनाशातून विकासाकडे नेणारा परिश्रमनिष्ठ सद्भाव म्हणजे ईशतत्त्वच की. शुभार्थी आणि डॉक्टर दोन्ही आहेत की माध्यमे. आमचे नाते जुळले दुःखावर फुंकर घालणाऱ्या मानसशास्त्रामुळे, मनोविकारशास्त्रामुळे.
अरे व्वा. प्रयत्नपूर्वक पण विरघळायला लागला की ‘मी’पणा. कधी प्रवासात, कधी समारंभात, कधी भाषणानंतर मंडळी स्वाक्षऱ्या घेतात, फोटो काढून घेतात तेव्हा मी कमीत कमी नखरे करतो. कारण माझ्या माध्यमातून माझ्या विज्ञानाबद्दलची काही जळमटे जळून पडणार असतात. तू इथे कलंकनिवारण म्हणजेच Destigmatization नावाच्या प्रक्रियेमधला एक घटक म्हणून उपस्थित आहेस. मला स्वतःला सांगावे लागते. ‘वेड्यांचा डॉक्टर’ ह्या अज्ञानी प्रतिमेला एक तडा जातोय त्या एका सेल्फीमधून. तू फक्त आत्ताचे माध्यम!
'तुमची पुस्तके वाचून, यूट्यूब पाहून, पॉडकास्ट ऐकून आमच्याकडे पेशंट्स येतात,' असे तरुण सहकारी सांगतात तेव्हाही ही भूमिका स्पष्ट होते की ‘मी’ हा फक्त त्या प्रक्रियेचा घटक आहे. एका जाहीर कार्यक्रमात एक तरुणी सहभागी झाली होती. ती व्यासपीठावरून म्हणाली, 'डॉक्टर, मला तुमचे जाहीर आभार मानायचे आहेत.
कारण तुम्ही घेतलेल्या कष्टामुळे आज माझी पिढी ताठ मानेने म्हणू शकते आहे की मला मानसिक मदतीची गरज आहे. फक्त टेन्शन आले म्हणून नव्हे तर स्वतःच्या विचार भावनांचा मागोवा घेणारा ‘सेल्फ मेंटेनन्स’ प्रोसेस आहे माझ्यासाठी थेरपी, आणि हे जाहीरपणे सांगण्याचे धैर्य तुम्ही मला दिले.'
ह्या प्रसंगातला ‘मी’ म्हणजे तिथे उपस्थित असलेला एक प्रतिनिधी. कोणाचा? तर मानसिक आरोग्यविषयक प्रबोधन करणाऱ्या आजवरच्या साऱ्या सहकाऱ्यांचा एक प्रतिनिधी. श्रेय कुणाचे तर सर्वांचे. श्रेयस म्हणजे अर्थपूर्णता कुणामुळे आली? फक्त प्रबोधनाचे विचार रुजवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे नाही.
तर शास्त्रीय विचार स्वतःच्या मनात रुजवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचाही हे सांघिक श्रेयस साधण्यामध्ये वाटा आहे की नाही. (श्रेयस म्हणजे अर्थपूर्ण Meaningful आणि प्रेयस म्हणजे आकर्षक, Attractive. हे आहेत कठोपनिषदातील शब्द.) लोकशिक्षणामध्ये प्रक्रिया असते ती विचार (जीवन) अधिक अर्थपूर्ण करण्याची. त्यासाठी प्रेयसचा आकर्षक साज कधीकधी द्यावा लागतो. पण ते प्रसाधन असते सौंदर्य नव्हे. ‘Make up’ does not make Beauty हे लक्षात ठेवण्यासारखे.
शुभार्थीची अर्थात रुग्णांची कृतज्ञता आणि डॉक्टरची नम्रता ह्या दोन्ही भावना विज्ञानाच्या कोंदणात बसवणे महत्त्वाचे. मी डॉक्टर म्हणून असा प्रामाणिक प्रयत्न करत असलो, तरी काही जण मला ‘नाटकी’ म्हणणार ही शक्यताही नम्रपणे स्वीकारावी लागते. मनापासून केलेली, कोत्या कुवतीची टीकाटिपणी प्रसाद म्हणूनच घ्यायची असते. डॉक्टर म्हणून माझा अहंकार समजा फोफावला, सोकावला तर अशा शेऱ्यांचा उपयोग अंजनासारखा करायचा.
लगेच जमिनीवर उतरते मन. समाजमाध्यमातून कधी खूप बोचरी, उथळ टीका होते. वैयक्तिक टोमणे मारले जातात. मुक्त अभिव्यक्ती प्रत्येकवेळी विवेकपूर्ण कशी असणार? म्हणून अशा टीकेलाही कृतज्ञतेने आपली म्हणायची. हा स्वीकार मात्र व्यक्ती म्हणून ‘मी’च करायचा. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातले महान आचार्यसुद्धा ज्यातून सुटले नाहीत त्यातून तू कसा सुटशील रे बाळा? असं स्वतःला समजावून पुढे जायचे असते.
'तुला कीव नाही येत अशा लोकांची?' माझा एक सहकारी मला म्हणाला.
'वास्तवाचे एक आगळे रूप त्यांच्या विचारातून माझ्यासमोर येते. किती ‘वेगळ्या’ पद्धतीने पाहू शकतात माणसं? सखेद आश्चर्य वाटते जरूर. संकुचित, पूर्वग्रहांबद्दलचा खेद आणि असा पण दृष्टिकोन असू शकतो त्याबद्दलचे आश्चर्य.' मी म्हणालो.
'मग तू काय करतोस?'
'माझे हेतू, मार्ग, सारी प्रोसेस पुन्हा एकदा तपासून पाहतो. फट दिसली तर लिंपून टाकतो. नाही दिसली तर समाधानाने पुढच्या वाटचालीला लागतो.'
(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)