तथागतांचं विराट विलक्षण जीवन
esakal November 17, 2024 09:45 AM

'माझा धम्म दुःखमुक्त करणारा आहे. हा माझ्या धम्माचा सत पथ आहे. आपल्या भल्याबुऱ्या कर्म परीक्षणाचा तो मापदंड आहे. या पंचशीलांचा अंगीकार प्रत्येक माणसानं करावा. या पंचशीलातून माणूस सत्त्वशील, सत्यशील, पुण्यशील, क्षमाशील बनतो.’

(बुद्धायन, प्रकरण - ३४, पृष्ठ - ३३२).

मराठीतले ज्येष्ठ लेखक सुरेशचंद्र वारघडे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धायन’ या चरित्र कादंबरीतील वरील उतारा आज देशातील आणि जागतिक स्तरावरील अनेक संघर्षाच्या घडामोडी पाहताना अधिक प्रस्तुत वाटू लागतो. तथागत गौतम बुद्धांची एक विराट आणि विलक्षण अशी चरित्र गाथा या दीर्घ कादंबरीतून वारघडे यांनी आपल्या समोर मांडली आहे. सिद्धार्थ अर्थात गौतमाच्या जन्मापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत झालेल्या प्रवासाची, विचारयात्रेची, मूल्यांच्या मंथनाची ही आगळीवेगळी चरित्रगाथा आहे.

‘बुद्धायन’ वाचत असताना वारघडे यांचं शब्दांवरचं प्रभुत्व, सहज सोपी शैली आणि आपल्या विषयाच्या गाभ्यात शिरण्याची तादात्म्यता लक्षणीय अशी आहे. अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी ज्या दार्शनिकानं आपलं तत्त्वज्ञान जगाला सांगितलं, त्याची ही विराट आणि व्यापक चरित्रगाथा वारघडे यांनी जणू भिक्खुसंघात वावरतच लिहिली असावी की काय, इतकी पराकोटीची तादात्म्यता हे लेखन वाचताना जाणवतं.

सिद्धार्थला वैशाख पौर्णिमेच्या दिनी ज्ञानप्राप्ती झाली, त्याच्या जन्माची आणि महापरिनिर्वाणाची तिथीही वैशाख पौर्णिमाच आहे. जिथे हे सगळे घडले, त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वातावरण अनुभवण्याचा एक लेखक म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला, त्याची परिणती या चरित्र गाथेमध्ये पदी येते.

पहिल्या ३० ते ३२ प्रकरणांत सिद्धार्थ जन्मापासून ते कपिलवस्तू नगरीतून ऐहिक जीवनाचा त्याग करून ज्ञानप्राप्तीच्या दिशेने निघालेल्या, राजपुत्र सिद्धार्थच्या प्रस्थानापर्यंत अनेक तपशील आणि संवादांनी भरलेला हा भाग आहे. आरंभीच्या भागात सिद्धार्थच्या भावाने म्हणजे देवदत्तने, जो बाण राजहंसाची शिकार करताना मारला, तो हळुवारपणे काढून राजहंसाला जगवण्याचा प्रसंग यात वाचायला मिळतो.

त्या वेळी सिद्धार्थ आणि राजघराण्यातील विविध व्यक्तींबरोबर झालेला त्याचा संवाद हा विलक्षण वेगळा आहे. पर्यावरण, निसर्ग आणि दुर्मीळ पक्षी प्रजाती यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राजघराण्यातील प्रत्येकाची असते, असा एक वस्तुपाठ सिद्धार्थ या निमित्ताने शिकार करणाऱ्यांसमोर ठेवतो. हा एखाद्या महाकाव्यात शोभावा असा प्रसंग आहे. वारघडे यांनी या प्रसंगातील सिद्धार्थच्या अंत:करणातील करुणाशीलता आणि प्राणिमात्रांबद्दल त्यांच्या अंत:करणात रुजलेली अपार सहानुभूती यांचे दर्शन घडवलंय.

कादंबरीच्या उर्वरित ३२ प्रकरणांमधून सिद्धार्थला झालेली ज्ञानप्राप्ती, त्यांच्या विचारांनी उभे राहिलेले भिक्खु संघ आणि समता, करुणा, अहिंसेचा विचार सांगत त्यांची झालेली दीर्घ भ्रमंती या सगळ्यातून तथागतांचं विचारसंपन्न आणि करुणामयी असं व्यक्तिमत्त्व उभं राहतं. कादंबरीच्या या उत्तरार्धातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञानाचे काही ठळक मुद्दे तथागतांनी वेळोवेळीच्या भ्रमंतीत अतिशय सोपेपणाने समजावून सांगितले, तो विशेष महत्त्वपूर्ण आहे.

चार आर्य सत्यं आणि अष्टांग मार्ग ही त्यांची विचारधारा आजही सर्वसामान्य स्वरूपात मांडली जाते. वारघडे यांनी अनेक तपशील देत, उदाहरणे देत त्याचा विस्तार केला आहे. तथागतांनी सांगितलेली चार आर्य सत्ये अशी आहेत : दुःखाचे अस्तित्व, दुःखाची कारणे, सर्व तृष्णा आणि वासनांचा त्याग आणि अष्टांग मार्गाच्या रूपाने तृष्णा मुक्त, वासना मुक्त होणे.

शेवटच्या भ्रमणातील तथागतांचे वावरणे आणि त्यांचे विविध प्रसंगाचे भाष्य याचा एक जिवंत आलेखच वारघडे यांनी उभा केला आहे, तो मूळ कादंबरीतच वाचायला हवा. ‘अत्त दीप भव ’ हा तथागतांचा संदेश आज जगभर मान्यता पावला आहे. शेवटच्या क्षणी आपल्या अनुयायांना निरोप देताना तथागतांनी हा उपदेश उच्चारला आणि त्यांनी डोळे मिटले. कादंबरीतील हे शेवटचे पान आपल्या अंत:करणाला स्पर्श करते.

‘तुच तुझा मार्ग निवड आणि तुच तुझ्या दिव्याच्या प्रकाशात पुढे वाटचाल कर,’ असा सुयोग्य संदेश तथागतांनी आपली दीर्घ वाटचाल संपवताना दिला, याचे मोल काही वेगळे आहे. भारतातील त्या वेळच्या खंडप्राय पसरलेल्या विविध गणराज्यांत तथागतांचे ४५ लाख भिक्खु होते, अशी एक नोंद लेखकाने ‘बुद्धायन’च्या आरंभी दिली आहे. या भिख्खु संघात कोणताही जातिभेद, वर्णभेद नव्हता. विषमता नव्हती, याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. ते लिहितात, ‘बुद्धांचा भिख्खु संघ म्हणजे भारतीय एकतेचे प्रतीक होता.’

तथागतांच्या या विचार आणि चरित्र गाथेचं योगदान फार मोठं आहे.

पुस्तकाचं नाव : बुद्धायन

लेखक : सुरेशचंद्र वारघडे

प्रकाशक : वनश्री प्रकाशन, पुणे.

(संपर्क : ९४२०८६१७२५)

पृष्ठं : ७३६, मूल्य : १२५० रुपये.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.