उत्तर प्रदेशात झाशीतील हृदयद्रावक घटना : 37 जणांना वाचविण्यात यश : उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/ लखनौ, झाशी
उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत किमान 10 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच 16 जण गंभीर जखमी झाले. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने या आगीच्या घटनेच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासासाठी चार सदस्यीन समिती नियुक्त करण्यात आली असून पुढील सात दिवसात ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.
ऐन मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यामुळे ऊग्णालयात एकच गोंधळ उडाला. कुटुंबीय आणि ऊग्ण जीव वाचवण्यासाठी धावू लागल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून 37 मुलांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताच्या वेळी एनआयसीयूमध्ये एकूण 54 मुलांना दाखल करण्यात आले होते. तथापि, 7 मुलांची माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेनंतर एनआयसीयूमधील बचावकार्य रात्री एक वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. या घटनेशी संबंधित सर्व तथ्ये तपासल्यानंतर अहवाल सार्वजनिक केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 1968 मध्ये सुरू झालेले हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुंदेलखंड प्रदेशातील सर्वात मोठ्या ऊग्णालयांपैकी एक आहे.
झाशीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील बुंदेलखंड विभागातील सर्वात मोठ्या सरकारी ऊग्णालयांपैकी एक असलेल्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘एनआयसीयू’ वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री 10.45 च्या सुमारास आग लागली. यात होरपळून मृत्यू झालेल्यांपैकी शनिवारी सात अर्भकांचे शवविच्छेदन करण्यात आले. तथापि, पालकांची ओळख न पटल्यामुळे तिघांचे शवविच्छेदन होऊ शकले नाही, असे झाशीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (शहर) ज्ञानेंद्र कुमार सिंग यांनी सांगितले.
अग्निशमन यंत्रणा कालबाह्या झाल्याचे आरोप फेटाळले
उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाल्याचे माध्यमांचे वृत्त फेटाळून लावले. ‘वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अग्निशमन उपकरणे पूर्णपणे ठीक होती,’ असे स्पष्ट करतानाच फेब्रुवारीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात अग्निसुरक्षा ऑडिट करण्यात आले आणि जूनमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सिंह सेंगर यांनीही हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना शोक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेचे वृत्त ‘अत्यंत हृदयद्रावक’ असल्याचे म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख ऊपयांची मदत जाहीर केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचे वर्णन ‘हृदय पिळवटून टाकणारी घटना’ असे करत पीडितांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांकडून तपासाच्या सूचना
उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या अपघाताचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 12 तासांत चौकशी अहवाल मागवला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य विभागाचे मुख्य सचिव झाशीला पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख ऊपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार ऊपये देण्यात येणार आहेत.
नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न
प्राथमिक तपासात शॉर्टसर्किट हे अपघाताचे कारण मानले जात आहे. तथापि, आग कोणत्या परिस्थितीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे लागली याचा सविस्तर तपास केला जात असल्याचे शहर पोलीस अधीक्षकांनी सांगितले. अपघातानंतर काही पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. एनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या मुलांची प्रकृती तपासली जात आहे. अपघाताच्या वेळी एनआयसीयूमध्ये 52 ते 54 मुलांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून 16 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
निष्काळजीपणा उघड
ऊग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. प्राथमिक तपासात प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. अग्निशमन यंत्रणा सदोष असल्याचे आढळून आले आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. इतर अनेक त्रुटीही समोर आल्या आहेत, यावरून या घटनेचे गांभीर्य दिसून येते. आता वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. एडीएम अऊण कुमार पांडे आणि एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंग या घटनेचा तपास करत आहेत. आग विझवणारे सिलिंडर रिफिलेबल नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.