मुंबई : ‘‘यूपीए’ सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी दिल्या गेलेल्या रकमेपेक्षा १३ पट अधिक रक्कम मोदी सरकारच्या कार्यकाळात देण्यात आली. रेल्वे विकासासाठी राज्यात तब्बल एक लाख ६४ हजार ६०५ कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली.
पत्रकारांशी ते बोलत होते. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्रात रेल्वेविकास वेगाने सुरू आहे. राज्यात नवे रेल्वेमार्ग, मार्गिका निर्मिती, रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, उड्डाणपुलांची अनेक कामे सुरू आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक गतिमान होण्यासह राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे, असे सांगून वैष्णव यांनी राज्यातील रेल्वे प्रकल्पांच्या कामाचे व्हिडिओ सादरीकरण केले.
देशाच्या विकासात मुंबईसह राज्याचा महत्त्वाचा वाटा असल्याने मोदी सरकारने तब्बल एक लाख ६४ हजार ६०५ कोटींची गुंतवणूक रेल्वे विकासासाठी केली आहे. याअंतर्गत सहा हजार कि.मी.चे नवे रेल्वेमार्ग, अमृत भारत स्थानक कार्यक्रमाअंतर्गत १३२ स्थानकांचा कायापालट, नवे मेट्रो मार्ग, ‘बुलेट ट्रेन’, मालवाहतुकीसाठी विशेष मार्गांची विविध विकासकामे सुरू असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.
राज्यातील रेल्वेमार्ग वाढवण्याची कामेही सुरू असून जालना -जळगाव मार्गाद्वारे मराठवाडा तसेच मनमाड-इंदूर नव्या मार्गाद्वारे खानदेश थेट ‘जेएनपीटी’शी जोडला जाईल, असे ते म्हणाले
स्थानकांचा पुनर्विकास
मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरही अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे, वसई, जोगेश्वरी, तर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, पनवेल आणि परळ ही स्थानके टर्मिनस होणार आहेत. लासलगाव, बडनेरा, पंढरपूर, नांदगावसारख्या छोट्या रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
मुंबईकरांचा लोकल प्रवास गतिमान
ते म्हणाले, ‘‘मुंबईकरांचा उपनगरी रेल्वे प्रवास वेगवान करण्यासाठी वेगाने अनेक कामे सुरू आहेत. लोकल रेल्वेची प्रवासी क्षमता वाढ आणि सुरक्षितता याला प्रधान्य दिले जात आहे. त्यासाठी १६ हजार २४० कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. सीएसएमटी ते कुर्ला पाचवी व सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे. हार्बर मार्ग बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येत आहे.