हिवाळा असो किंवा उन्हाळा, टाचांना भेगा पडणे ही समस्या अनेकदा उद्भवते.टाचांना भेगा पडण्याची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना उद्भवू शकते. विशेषतः अनवाणी पायाने चालणे, पायांची योग्य देखभाल न करणे, चिखल, पाणी किंवा धूळ यांचा पायाला होणारा संपर्क आणि काही आरोग्यविषयक समस्या यामुळे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. टाचांना भेगा पडल्याने पायांमध्ये वेदना, त्वचा कोरडी होणे आणि रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही सोप्या आणि घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
istockphoto
टाचांना भेगा का पडतात?1. कोरडी त्वचा: पायांची त्वचा पुरेशी आर्द्रता मिळत नसल्यास कोरडी होऊन फाटू शकते.
2.अनियमित स्वच्छता: पायांची नियमित स्वच्छता न केल्यास धूळ, घाण, आणि चिखल यामुळे टाचांना भेगा पडू शकतात.
3. अपुरे पोषण:व्हिटॅमिन ई, झिंक, किंवा ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते.
4. जास्त उष्णता किंवा थंडी: ऋतुमानातील बदल त्वचेला सुकवू शकतात.
5. दीर्घकाळ उभे राहणे: कठीण पृष्ठभागावर दीर्घकाळ उभे राहिल्याने पायांवर अतिरिक्त दाब येतो.
टाचांना भेगा पडण्यापासून वाचण्यासाठी उपाय
1.पायांची स्वच्छता ठेवा: रोज रात्री कोमट पाण्याने पाय धुऊन कोरडे करून मॉइश्चरायझर लावा.
2. सुरक्षात्मक पादत्राणे वापरा:चिखल, धूळ, किंवा पाण्यात जाण्यापूर्वी चांगल्या दर्जाच्या पादत्राणांचा वापर करा.
3. हायड्रेशन ठेवा:त्वचा कोरडी पडू नये म्हणून पुरेसे पाणी प्या आणि त्वचेला हायड्रेट ठेवणारे लोशन वापरा.
4. पायांना वेळोवेळी स्क्रब करा: मृत त्वचेला काढण्यासाठी सौम्य स्क्रबचा वापर करा.
5. योग्य आहार घ्या:आपल्या आहारात फळे, भाज्या, कोरडे मेवे, आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश करा.
टाचांना भेगा पडल्यावर उपयुक्त घरगुती उपचार
तूप किंवा खोबरेल तेल:झोपण्यापूर्वी तूप किंवा खोबरेल तेल लावून मोजे घालावेत. यामुळे त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते. ग्लिसरीन आणि लिंबाचा रस हा देखील उपयोगी आहे,ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस मिसळून टाचांवर लावा. १५-२० मिनिटांनी पाय स्वच्छ धुऊन मॉइश्चरायझर लावा. तुम्ही केळीचा मास्क लाऊ शकता . एक पिकलेले केळं चांगलं मॅश करून टाचांवर लावा आणि २० मिनिटांनंतर पाण्याने धुवा. गरम पाण्याचा वापर करा कोमट पाण्यात मीठ मिसळून पाय त्यात काही वेळ ठेवा. यामुळे त्वचा मऊ होते. तुम्ही एलोवेरा जेल ही लाऊ शकता. झोपण्यापूर्वी टाचांवर ताजं एलोवेरा जेल लावून मोजे घाला आराम मिळेल.
हेही वाचा :तुमच्याही स्किनला सुरकुत्या पडतात का? करा 'हे' उपाय
वैद्यकीय सल्ल्याची गरज कधी?जर टाचांतील भेगा रक्तस्त्राव करत असतील, तीव्र वेदना होत असेल किंवा संसर्गाची शक्यता वाटत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. टाचांना भेगा पडणे ही सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. यावर वेळेवर उपाय केले तर ती सहज टाळता येऊ शकते. रोजच्या आयुष्यात काही साधे बदल आणि योग्य पद्धतींचा अवलंब करून आपण आपल्या पायांची आरोग्यदायी त्वचा टिकवू शकतो.