वृत्तसंस्था/ नवी दिल्ली-पर्थ
भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज शुभमन गिलच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याने शनिवारी भारताला मोठा धक्का बसला. त्यामुळे तो बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर 22 नोव्हेंबरपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे.
भारताच्या मागील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील विजयाच्या तऊण नायकांपैकी एक राहिलेला गिल हा फलंदाजीचा मुख्य आधार आहे आणि कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्यास भारताची वरची फळी खूपच कमकुवत दिसू शकते. संघातर्गत सामन्याच्या सरावाच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना गिलला ही दुखापत झाली. त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसले आणि लगेच स्कॅनिंग करून घेण्यासाठी त्याने मैदान सोडले.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गिलच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे आणि पहिली कसोटी सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने या शैलीदार खेळाडूला सुऊवातीच्या सामन्यासाठी वेळेत तंदुऊस्त होणे जवळपास अशक्य होईल. अंगठ्याचा फ्रॅक्चर ठीक होण्यासाठी साधारणपणे 14 दिवस लागतात. त्यानंतर नियमित जाळ्यात सरावाचे सत्र सुरू करणे अपेक्षित असते. अॅडलेडमध्ये 6 डिसेंबरपासून दुसरी कसोटी सुरू होणार असून तो त्या सामन्यासाठी वेळेत तंदुऊस्त होण्याची शक्यता आहे.
गिलची अनुपस्थिती संघाला महागात पडू शकते. कारण तो केवळ तिसऱ्या क्रमांकावरील स्थिर फलंदाज नाही, तर रोहितच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालसह डावाची सुऊवात करण्यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो. संघांतर्गत सामन्याच्या सरावाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध कृष्णाचा आखूड टप्प्याचा चेंडू आदळून लोकेश राहुलचा कोपर दुखावला होता आणि त्याला मैदान सोडावे लागले होते.