ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
प्रणय निर्बाण, एबीपी माझा November 17, 2024 04:13 PM

अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. काल अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांची सभेत मोठा राडा झाला. काही लोकांनी सभेत खुर्च्या फेकत राडा घातला होता. या हल्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. आता या प्रकरणी नवनीत राणा यांनी आरोपींना जर अटक झाली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येईल, असा इशारा दिला होता. आता ते कापाकापाची भाषा करत असतील तर आमची देखील भाषा कापण्याची राहील, अस इशारा नवनीत राणा यांनी दिलाय. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) नवनीत राणांनी गंभीर आरोप केलाय. 

नवनीत राणा म्हणाल्या की, पोलिसांची सगळे टीम काम करत आहे. आम्ही एकालाही सोडणार नाही, असे पोलिसांनी मला सांगितले आहे. आम्ही लोकसभेत शांतीप्रिय प्रचार केला होता. आता सुद्धा आम्ही शांतीप्रिय पद्धतीने प्रचार करत होतो. त्या लोकांनी गोंधळ सुरू केला होता. मी शांततेत भाषण करत होते. माझ्या सभेत दोनशे ते अडीचशे अपंग व्यक्ती बसलेल्या होत्या. मी भाषण करताना ते लोक माझ्याबाबत आक्षेपार्ह पद्धतीने बोलत होते. 

आम्ही शांत बसणार नाही

सभा झाल्यानंतर मी लोकांना भेटत असताना मला पाहून त्या लोकांनी शिवीगाळ केली. आम्ही तुम्हाला मारून टाकू, असे म्हटले. त्यानंतर त्या लोकांनी खुर्च्या उचलून आमच्या लोकांना मारण्यास सुरुवात केली. माझ्या पोलीस सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण झाली. माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. जर त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमची देखील भाषा कापण्याची राहील, आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला. 

ते उद्धव बाळासाहेब ठाकरे नव्हे तर...

या प्रकरणी तुमचा कोणावर आरोप आहे? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, ते गाव उद्धव ठाकरे यांच्या तालुकाध्यक्षांचे गाव आहे. उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाहीत, ते जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत. त्यांना आमच्या बाबतची चिड होती, त्याबाबतचे दृश्य महाराष्ट्राला दिसलेला आहे. पण ते विसरले की, आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालत आहोत. बाळासाहेब ठाकरे जेव्हा मंचावर उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचे काम करत होते. तसे मी सुद्धा त्यांचीच मुलगी म्हणून त्यांचे विचार घेऊन मैदानात उतरली आहे. 

आणखी वाचा 

मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.