कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीतर्फे आमदार बाळासाहेब पाटील, तर महायुतीतर्फे भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात लढत होत आहे.
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तरमध्ये (Karad North Assembly Election) महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), तर महायुतीकडून मनोज घोरपडे हे, तर कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, आमदार (Prithviraj Chavan) यांच्या विरोधात महायुतीतर्फे भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यात प्रमुख लढत होत आहे. चारही उमेदवारांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस गट आणि आमदार पाटील गटात दरी पडली होती.
त्यानंतर पहिल्यांदाच आमदार चव्हाण हे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेच्या व्यासपीठावर आले. त्यांनी कऱ्हाड उत्तरमध्ये यशवंत विचाराला साथ देण्याचे आवाहन करून आमदार पाटील यांना हात दिला. दोन्ही आमदारांच्या गटांनी निवडणुकीसाठी जुळवून घेतल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. दरम्यान, यामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या (Congress) विचाराचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळेच आतापर्यंत ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव मोहिते, माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील -उंडाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या तिघांनीच या मतदारसंघांचे नेतृत्व केले आहे. हा मतदारसंघ इतर पक्षाच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी काँग्रेसकडून नेहमीच प्रयत्न झाले आहेत. यावेळीही आमदार चव्हाण यांनी हा मतदारसंघ काँग्रेसच्याच विचारांचा राहावा, यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, या वेळी या मतदारसंघातील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावून तेथे भाजपचे कमळ फुलविण्यासाठी महायुतीकडून भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जोरदार तयारी केली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून डॉ. भोसलेंना ताकद दिली. त्यामुळे कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची बनली आहे. त्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत कऱ्हाड दक्षिणमधील विजयासाठी आमदार पाटील यांच्या गटाचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमदार पाटील यांचा गट कऱ्हाड पालिकेच्या माध्यमातून कऱ्हाड शहरात लोकशाही आघाडीद्वारे कार्यरत आहे, तसेच सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातूनही कऱ्हाड दक्षिणेतील अनेक गावांत आमदार पाटील यांचा गट कार्यरत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील गटाच्या भूमिकेला महत्त्व आहे.
कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या पॅनेलला माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी थेट फिल्डवर उतरून खंबीर साथ दिली, तर आमदार पाटील यांनी त्या निवडणुकीत अनेक वर्षांनंतर भाजपचे डॉ. भोसले गटाबरोबर जुळवून घेत त्या निवडणुकीत संयुक्त पॅनेल टाकले. त्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या विचाराचे पॅनेल निवडून आले.
मात्र, त्यावेळपासून आमदार चव्हाण गटापासून आमदार पाटील गटाने फारकत घेतल्याचे चित्र आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित रहिमतपूर येथील जाहीर प्रचार सभेस आमदार चव्हाण हे व्यासपीठावर आले. त्यामुळे उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, दोन्ही आमदारांच्या गटांनी निवडणुकीसाठी जुळवून घेतल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
कऱ्हाड उत्तरमधील काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष...कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीतर्फे आमदार बाळासाहेब पाटील, तर महायुतीतर्फे भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात आमदार पाटील यांनी सलग पाच वेळा निवडून येऊन गड मजबूत ठेवला आहे. यावेळीही तो गड राखण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. भाजपतर्फे श्री. घोरपडे यांना महायुतीची उमेदवारी देऊन कोणत्याही परिस्थितीत कऱ्हाड उत्तरेत कमळ फुलविण्यासाठी पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली आहे.
दरम्यान, कऱ्हाड उत्तरेत आमदार चव्हाण यांचाही पूर्वीपासून त्या मतदारसंघात गट सक्रिय आहे. कालच रहिमतपूर येथे सभेत आमदार चव्हाण हे आमदार पाटील यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी यशवंत विचार जपण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तरेतील कॉँग्रेसची भूमिका काय राहणार? हेही महत्त्वाचे ठरणार आहे.