IND vs SA: सर्वोत्तम खेळ करणे हेच विजयाचं सूत्र, सूर्यकुमार द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयावर झाला व्यक्त
esakal November 17, 2024 08:45 PM

South Africa vs India T20I: निकालाचा विचार करून आम्ही खेळत नाही. सर्वोत्तम खेळ करणे हेच आमचे विजयाचे सूत्र आहे, असे मत भारतीय टी-२०चा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-१ असा विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने अखेरच्या चौथ्या सामन्यात आफ्रिकन संघाला सळो की पळो करून सोडले आणि १३५ धावांनी मोठा विजय मिळवला.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी झंझावाती शतके करून उभारलेली २० षटकांतील २८३ ही धावसंख्या आफ्रिकन फलंदाजांना झेपलीच नाही. त्यांचा डाव १४८ धावांत संपुष्टात आला. या मालिकेत सलग दोन शतके करणारा तिलक वर्मा सामन्यात आणि मालिकेत सर्वोत्तम ठरला.

परिस्थितीनुसार खेळात बदल करणे हे आमचे उघड गुपित आहे. गतवर्षी आम्ही जोहान्सबर्गमधील या मैदानात खेळलो तेव्हाही असाच आक्रमक खेळ केला होता. तोच पवित्रा आम्ही यावेळीही कायम ठेवला. उत्तम खेळ करत राहणे हाच आमचा विचार असतो. आम्ही निकाल गृहीत धरून खेळ करत नाही, असे सूर्यकुमार म्हणाला.

सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये कोण उजवा होता याची निवड करू शकत नाही. या दोघांसह अभिषेक शर्मानेही तेवढीच आक्रमक फलंदाजी केली, असे सूर्यकुमार म्हणाला.

सायंकाळी विद्युत प्रकाशझोतात खेळपट्टीत काहीतरी बदल झाल्याचे जाणवले. तापमानही चांगल्या प्रमाणात कमी झाले आणि आम्ही या संधीचा फायदा घेतला. योग्य दिशा आणि टप्प्यावर मारा केला आणि यश आम्हाला मिळत गेले, असे सांगून सूर्यकुमारने पुढे सांगितले.

दक्षिण आफ्रिकेत खेळताना नेहमीच आव्हान असते, त्यामुळे मालिका जिंकणे हे माझ्यासाठी खास आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.