Sachin Tendulkar Post: सचिन तेंडुलकरच्या पोस्टची चर्चा; अंपायरसह 'तो' वादग्रस्त निर्णय आला चर्चेत
Times Now Marathi November 17, 2024 08:45 PM

: लोकप्रिय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची अनेकदा चर्चा असते. त्याला निवृत्त होऊन 12-13 वर्षे झाली आहेत तरीही त्याची क्रिकेटविश्वात कायमच चर्चा असते. सध्या त्याच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यावेळी त्याने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात त्याच्या मागे स्टंप्सच्या आकाराची तीन मोठी झाडं आहेत आणि पुढे तो बेटिंग करण्याच्या पोझमध्ये उभा आहे. यावेळी त्याच्या कॅप्शनने सर्वांना काही वर्षे मागे नेले आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ''तुम्ही अंदाज लावू शकता का की कोणत्या अंपायरला स्टंप इतका मोठा वाटायचा?'' त्यावरून अनेकांनी स्टीव्ह बकनर यांचे नाव पटकन घेतले. त्यातून चाहत्यांना त्या दोन वादग्रस्त निर्णयांची आठवण झाली. नक्की ते वादग्रस्त निर्णय काय होते? आणि सचिनच्या पोस्टवरून स्टीव्ह बकनर हे चर्चेत का आले आहेत? सोबतच अशा कॅप्शनमागे नक्की काय कहाणी आहे?

काय होती घटना?
वेस्ट इंडिजच्या माजी अंपायरने सचिन तेंडुलकरविरुद्ध अनेक चुकीचे निर्णय दिले होते ज्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला. त्याचे दोन असे वादग्रस्त निर्णय सर्वज्ञात आहेत जे आजही चाहत्यांच्या मनात खदखदत आहेत. यापैंकी एक 2003 मध्ये गब्बा कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियातील सामान्यात आहे. तर दुसरा 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या ईडन गार्डन्सवरील सामन्यातील आहे. या दोन्ही सामन्यांदरम्यान स्टीव्ह बकनर या अनुभवी अंपायरने दिलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे सामन्याची दिशाच बदलली होती, अशी चर्चा अनेक वर्षे रंगलेली होती. आता सचिनच्या या पोस्टने एकप्रकारे चाहत्यांच्या त्या वाईट आठवणी ताज्या झाल्या आहेत.

दोन वादग्रस्त निर्णय
2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सचिनला चुकीच्या पद्धतीने एलबीडब्ल्यू आऊट केले होते. हा निर्णय स्टीव्ह बकनर यांनी दिला होता. यामागील कारण असे दिले होते की, चेंडू हा विकेट्सवरून जात असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते. पण बकनर यांना ते मान्य नव्हते. त्यावेळी अंपायरच्या निर्णयाला आव्हान देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे सचिनला परत जावे लागले. तर 2005 च्या कसोटी सामान्यात सचिनला अब्दुल रझाकच्या चेंडूवर झेलबाद देण्यात आले होते. त्याक्षणी बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. पण अंपायरने त्याला बाद घोषित केले. हा निर्णयही स्टीव्ह बकनर यांचाच होता.


कोण आहेत स्टीव्ह बकनर?
स्टीव्ह बकनर हे निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अंपायर आहेत. ते सध्या 78 वर्षांचे आहेत. त्यांचे अंपायरींगचे करिअर प्रदीर्घ राहिले आहे. 1989-2009 पर्यंत त्यांनी 128 कसोटी सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे. याशिवाय त्यांनी 181 एकदिवसीय सामन्यांमध्ये अंपायरींग केली. त्यांनी सलग पाच विश्वचषक फायनलमध्ये अंपायर म्हणून काम केले आहे. अंपायरिंग करण्यापूर्वी, बकनर हे फुटबॉल खेळाडू आणि हायस्कूलचे शिक्षक देखील होते. त्यांनी मार्च 1989 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यातून अंपायर म्हणून पदार्पण केले होते.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.