Kalyan Rural Assembly Election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : मनसेचे राजू पाटील की शिवसेनेचे सुभाष भोईर, कोण बाजी मारणार?
स्नेहल पावनाक November 17, 2024 09:13 PM

Kalyan Rural Assembly Constituency Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असताना सर्वच पक्ष प्रचारात जोर मारताना दिसत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण मतदारसंघातही प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कल्याण ग्रामीमध्येही राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. कल्याण मतदारसंघात ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील, सुभाष भोईर आणि राजेश मोरे अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

कल्याण ग्रामीण हा ठाणे जिल्ह्यात येतो आणि त्यात ठाणे तालुक्यातील काही भाग समाविष्ट आहेत. 2009 मध्ये मतदारसंघांची पुर्नरचना करण्यात आल्यावर कल्याण ग्रामीण मतदारसंघ तयार झाला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात ठाणे तालुक्यातील आणि नवी मुंबई तालुक्यातील काही भाग येतो. हा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो.

मतदारसंघातील प्रमुख लढती

  • प्रमोद उर्फ राजू रतन पाटील - मनसे
  • सुभाष भोईर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • राजेश गोवर्धन मोरे - शिवसेना

मतदारसंघातील समस्या 

कल्याण ग्रामीण मतदार संघातील पाणी समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे. या मतदारसंघात आगरी-कोळी बांधव आणि भुमिपुत्र हा मोठा मतदारवर्ग आहे. या निवडणुकीत भुमिपुत्रांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिवसैनिकांच्या मतांमध्येही फूट पडली आहे. याचा नेमका मतदारांवर काय परिणाम होतो ते या निवडणुकीत समोर येईल. 

सध्याची परिस्थिती

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्याची लढत थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांच्यात होत असल्याचं बोललं जात आहे.

मतदारसंघातील आतापर्यंतचा निकाल

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी 93,927 मतांनी विजय मिळवला. त्यावेळी शिवसेनेचे रमेश  म्हात्रे यांना 86,773 मते मिळाली होती. त्याआधीच्या 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी 84,110 मतांनी विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश पाटील यांना 39,898 मते मिळाली होती.

2019 चा निकाल

  • प्रमोद (राजू) पाटील - मनसे (93,927 मते)
  • रमेश म्हात्रे - शिवसेना (86,773 मते)

2014 चा निकाल

  • सुभाष भोईर - शिवसेना (84,110 मते)
  • रमेश पाटील - मनसे (39,898 मते)

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.