वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय संस्कृतीचा ठेवा असलेल्या, तथापि, भारतातून तस्करीच्या मार्गाने अमेरिकेत पोहचलेल्या 1 हजार 440 पुरातन मूर्ती आणि प्रतिके यांची अमेरिकेने भारतात परतपाठवणी केली आहे. या ऐतिहासिक ठेव्याचे सांप्रतचे मूल्य 80 कोटी रुपयांहून अधिक आहे. या मूर्ती भारताला परत करत असल्याची घोषणा अमेरिकेकडून शुक्रवारी करण्यात आली असून लवकरच त्या भारतात पोहचत आहेत, असे भारताकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. 80 च्या दशकात या मूर्तींची चोरी मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमधून करण्यात आली होती. नंतर अनेक देशांचा प्रवास करत या मूर्ती तस्करीच्या मार्गाने अमेरिकेत पोहचल्या होत्या.
या मूतीँची चोरट्या मार्गाने विक्री अमेरिकेत कोट्यावधी डॉलर्सना केली जात होती. तथापि, अमेरिकेच सुरक्षा यंत्रणेने या मूर्ती जप्त करुन सुरक्षित ठेवल्या होत्या. भारताने यासंबंधीची माहिती अमेरिकेला दिल्यानंतर अमेरिकेच्या प्रशासनाने त्या भारताला परत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची घोषणा सोमवारी करण्यात आली. आता काही महिन्यांमध्ये त्या भारतात परत येणार आहेत. त्यांची स्थापना मूळ मंदिरांमध्ये करण्यात येणार असून यापुढे त्यांची सुरक्षा अधिक सजगपणे करण्यात येणार आहे, असेही भारताने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे.