वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 20 नोव्हेंबर 2024 रोजी चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांची भेट घेणार आहेत. ही बैठक पुढील आठवड्यात लाओसमध्ये होणाऱ्या आसियान परिषदेत होणार आहे. गेल्या महिन्यात पूर्व लडाखमध्ये दोन्ही सैन्यांमधील मतभेद दूर झाल्यानंतर आणि गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने डेपसांग भागात पुन्हा गस्त सुरू केल्यानंतर दोन्ही देशांमधील ही पहिली मंत्रीस्तरीय बैठक असेल.
एप्रिल 2023 नंतर दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री प्रथमच एकमेकांना भेटणार आहेत. यापूर्वी चीनचे तत्कालीन संरक्षणमंत्री ली शांगफू शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी दिल्लीत आले होते. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रशियात भेट झाली होती. त्यानंतर आता ही बैठक होणार आहे. वास्तविक, पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून तणाव होता. दोन वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर, दोन्ही सैन्याने डेपसांग आणि डेमचोक या विवादित बिंदूंवरून माघार घेण्याचा करार झाल्यापासून सीमेवरील तणावाचे वातावरण निवळल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहे.