एचसीएल टेक आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज
esakal November 18, 2024 01:45 PM

भूषण गोडबोले

शेअर बाजार अभ्यासक-विश्लेषक

भारतीय आयटी उद्योगाने गेल्या दोन दशकांत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील डिजिटलायझेशन, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बिग डेटा आणि क्लाउड कॉप्युटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये होणारी वाढ भारतीय आयटी कंपन्यांसाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे. भारतीय आयटी निर्देशांकाने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. कोविड महासाथीनंतरच्या काळात डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशनवर भर दिल्यामुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर प्रकल्प मिळाले.

२०२४ मध्ये आयटी निर्देशांकाने थोडी स्थिरता दाखवली असली, तरी जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधारणा; तसेच नव्या करारांमुळे भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करत असलेल्या या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दीर्घावधीमध्ये उत्तम परतावा मिळू शकतो.

एचसीएल टेक (शुक्रवारचा बंद भाव रु. १८५९) ही भारतातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादार कंपनी आहे. कंपनी डिजिटलायझेशन, क्लाउड कॉप्युटिंग, सायबर सिक्युरिटी, तसेच इंजिनिअरिंग सोल्यूशन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा देते. जाहीर झालेल्या निकालानुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे १० टक्के वाढ झाली असून, तो ४२३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीने क्लाउड सर्व्हिसेस, सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्स आणि डिजिटल इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. आगामी काळात कंपनीने मार्जिन सुधारणा आणि ग्राहक पोर्टफोलिओ विस्ताराचे उद्दिष्ट ठेवले आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजीज (शुक्रवारचा बंद भाव रु. १३५७) ही भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर तसेच अभियांत्रिकी सेवा पुरवठादार कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन, स्वायत्त वाहन तंत्रज्ञान, तसेच कनेक्टेड वाहनांसाठी नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते.

जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगातील सर्वांत मोठ्या ब्रँडना सेवा पुरवणाऱ्या या कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे ४४ टक्के वाढ झाली असून, तो २०४ कोटी रुपयांवर पोचला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांपासून कनेक्टेड वाहनांपर्यंतच्या बदलत्या गरजांमध्ये ही कंपनी आपले स्थान मजबूत करत आहे. इक्विटीवर प्रतिवर्ष सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत ज्या कंपन्या अशा प्रकारे आपल्या व्यवसायात प्रगती करत आहेत, अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेत, मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.