25 वर्षात ज्यांनी सर्वांना चॉकलेट दिलं त्यांना आता विश्रांती देण्याची गरज, नाना पटोलेंच्या गृह जिल्ह्यात काँग्रेस नेत्याचाच घरचा अहेर
देवेंद्र रहांगडाले November 18, 2024 03:13 PM

Sakoli Vidhan Sabha constituency: नाना पटोलेंनी (Nana Patole) 25 वर्ष साकोली विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, त्यांनी पाच जणांनाही नोकरीला लावले नाही. नाना पटोले नवीन नेतृत्व निर्माण होऊ देत नसल्याचा घणाघाती आरोप डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी केला आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभा मंचावरुन त्यांनी हे वक्तव्य करत एकप्रकारे नाना पटोलेंच्या गृह जिल्ह्यात काँग्रेस नेत्यानेच नानांना घरचा अहेर दिला आहे.

गृह जिल्ह्यात काँग्रेस नेत्याचा नानांना घरचा अहेर

नाना पटोले यांनी आतापर्यंत सर्वांना चॉकलेट दिलेत. त्यांनी 25 वर्षात साकोलीचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून आता त्यांना विश्रांतीची गरज असल्यानं महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलय. नाना पटोले यांच्यावर आरोप करणारे महायुतीचे नेते नसून नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे आणि काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते आहेत.

डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते यांनी नाना पटोले यांचा प्रचार करण्याऐवजी त्यांच्या ध्येय धोरणामुळं कंटाळून महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचार सभेत उपस्थिती लावून तिथं उपस्थितांना मार्गदर्शन केलं. काँग्रेसचा नेता महायुतीच्या प्रचार सभेत उपस्थिती लावणे म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हा जबर धक्का आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते डॉ. निंबार्ते यांनी महायुतीच्या प्रचार सभेत उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. 

भंडारा विधानसभेत काँग्रेससह विरोधकांचाही फुगा फुटेल

प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सकाळपासूनच प्रत्येक उमेदवारांनी त्यांचा रोड शो आणि प्रचार यात्रेला सुरुवात केलेली आहे. भंडारा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनीही रोडशो सुरू केला असून त्यांनी या निवडणुकीत काँग्रेस सोबतच विरोधकांचाही फुगा फुटेल आणि त्यांचा विजय निश्चित होईल, असा दावा केला आहे. 

कोण आहेत डॉ चंद्रकांत निंबार्ते?

काँग्रेसच्या भंडारा जिल्हा डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष 
काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ मनीषा निंबार्ते यांचे पती 
नाना पटोले यांनी डॉ निंबार्ते यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्याचा शब्द दिला होता.
लोकसभा निवडणुकीत तिकीट नं मिळाल्यानं डॉक्टर निंबार्ते हे तेव्हापासून नाना पटोले यांच्यावर होते नाराज. 

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.