आयपीएल 18 व्या मोसमाआधी मेगा ऑक्शनकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. त्याआधी आयपीएलच्या गेल्या 17 मोसमात एकदाही ट्रॉफी न जिंकू शकणाऱ्या आरसीबीने मोठा डाव खेळला आहे. आरसीबीने मुंबईला चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाचा टीममध्ये समावेश केला आहे. ओमकार साळवी यांची आरसीबी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. ओमकार साळवी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मुंबईला रणजी ट्रॉफी आणि इराण कप जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिलं होतं.
ओमकार साळवी कोच असतानाच मुंबई टीमने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. इतकंच नाही, तर मुंबईने इराणी कप सलग 2 वेळा उंचावला. ओमकार साळवी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मुंबईला गतवैभव मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला. ओमकार साळवी यांनी याआधी कोलकाता नाईट रायडर्समध्ये सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार साळवी देशांतर्गत क्रिकेट हंगाम संपल्यानंतर मार्च 2025 मध्ये आरसीबीसह जोडले जाणार आहेत. ओमकार साळवी यांचा एमसीएसोबतचा करार हा मार्चमधील पहिल्या आठवड्यात संपणार आहे.
बॉलिंग ही आरसीबीची उणीवेची बाजू आहे. अशात ओमकार साळवी यांच्यासमोर आरसीबीच्या गोलंदाजीला धार मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे, साळवी मुंबईसह 2023-2024 या हंगामासाठी हेड कोच म्हणून जोडले गेले. त्यांच्या मार्गदर्शनात मुंबईने 42 व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. त्यामुळे साळवी यांना रिटेन करण्यात आलं.
ओमकार साळवी आरसीबीचे बॉलिंग कोच
दरम्यान आरसीबीला आयपीएलच्या इतिहासात गेल्या 17 वर्षांमध्ये एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आलेलं नाही. आरसीबी 2016 साली अंतिम फेरीत पोहचली होती. मात्र तेव्हा हैदराबादने पराभूत केल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. तर 17 व्या मोसमात आरसीबीचा एलिमिनेटर सामन्यात पराभव झाला होता.