Chikhli Assembly Election 2024 : चिखली हा महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. चिखली मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. कारण मोदी लाटेतही राहुल बोंद्रे विजयी झाले होते. पण 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्वेता विद्याधर महाले यांनी काँग्रेसच्या विद्यमान आमदारावर बहुमताने विजय मिळवून त्यांचा 15 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. आता भाजप महायुतीच्या विद्यमान आमदार श्वेता महाले विरुद्ध काँग्रेस मविआचे राहुल बोंद्रे यांच्यात थेट लढत होत आहे. कोण बाजी मारणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
गेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा निसटता पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत श्वेता महाले यांना 95515 मते मिळवली होती. तर राहुल बोंद्रे यांना 86,705 मते मिळाली होती.
श्वेता महाले यांनी चिखलीतील जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी सभापती असताना सर्कलसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विभागातील कामे केली होती. या मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर श्वेत महाले थेट विधानसभेसाठी उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या होत्या.