माहिती घ्या; मगच टीका करा
देवगड नगराध्यक्ष ः घनकचराप्रश्नी तारींना प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः देवगड जामसंडे शहराचा घनकचरा व्यवस्थापन प्रश्न का निर्माण झाला? याची ठाकरेगट शिवसेना नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी प्रथम माहिती घ्यावी आणि मगच भाजपला दोषी धरावे. तत्कालीन स्थितीत तात्पुरता कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने पर्यायी जागा पाहून तेथे कचरा टाकल्याची माहिती श्री. तारी यांना नसावी असा पलटवार भाजपचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला. श्री. तारी यांच्या प्रभागातील शौचालयाची अवस्था कठीण बनली असल्याकडेही श्री. चांदोस्कर यांनी लक्ष वेधले.
ठाकरेगट शिवसेना पक्षाचे नगरसेवक श्री. तारी यांनी नुकतीच शहराच्या घनकचरा प्रश्नासंदर्भात टीका केली होती. त्याला श्री. चांदोस्कर यांनी जामसंडे येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी दयानंद पाटील, चंद्रकांत कावले उपस्थित होते. श्री. चांदोस्कर म्हणाले, ‘‘नगरपंचायत कार्यालयाबाजूलाच शहरातील संकलित केलेला घनकचरा टाकला जात असल्याने तेथे दुर्गंधी पसरली होती. यावर उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात घनकचरा टाकण्यासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर २५ ऑक्टोबरला नगरपंचायत प्रशासनाने जामसंडे भटवाडी येथील एका जागेचा करार केला होता. त्याठिकाणी २६ ऑक्टोबरपासून कचरा टाकण्यास सुरूवातही झाली. मात्र, सुयोग्य रस्त्याअभावी घनकचरा उचलणे बंद झाले असावे, याची माहिती श्री. तारी यांना नसावी. यासाठी त्यांनी प्रथम माहिती घेऊन मगच भाजपवर टीका करावी. शहराचा घनकचरा प्रश्न आमदार नीतेश राणे नक्की सोडवतील. श्री. तारी यांच्या प्रभागातीलच शौचालयाची अवस्था बिकट बनली आहे. पवनचक्की उद्यान झाल्यानंतर स्थानिक पर्यटनाला चालना मिळून शहराचे अर्थकारण बदलले. त्यांच्याच प्रभागातील काही कुटुंबाना तेथे व्यवसायाची संधी उपलब्ध झाली. मात्र, तारी यांना स्वतः काही करायचे नाही आणि आम्ही केले तर त्यावर टिका करायची एवढेच माहिती आहे. नगरपंचायत निवडणूकीत संदेश पारकर यांनी घरोघरी असाच प्रचार करून सत्ता मिळवली होती. आताही मते मागण्यासाठी ते फिरत असले तरी जनता त्यांना थारा देणार नाही. आमदार राणे व्हिजनरी नेते असल्याने तारी यांनी त्यांच्यावर टीका करण्याचे टाळावे.’’