India Vs Australia : हा खेळाडू प्लेईंग ११ मध्ये खेळलाच पाहिजे.... सौरव गांगुलीची स्पष्ट शब्दात दादागिरी
Mensxp November 19, 2024 03:45 AM

India Vs Australia 1st Test  : 

बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना हा पर्थ इथं २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या सामन्यात भारताचं टीम कॉम्बिनेशन काय असेल हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण भारतीय संघाचा कर्णधार उपलब्ध नाहिये. त्यात अनेक खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे गौतम गंभीरसाठी शुक्रवारी होणाऱ्या कसोटी सामन्यात कोणाला खेळवायचं ही मोठी डोकेदुखी असणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरूद्धच्या तीन कसोटी सामन्यातील भारताची सुमार कामगिरी हा देखील चर्चेचा विषय ठरणार आहे. 

भारतीय संघ ज्यावेळी सेना देशात म्हणजे साऊथ अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात दौरा करतो त्यावेळी कसोटी संघातील भारताचा एक नंबरचा स्पिनर अश्विनला बऱ्याचवेळा संघाबाहेर बसावं लागतं. पर्थ कसोटीपूर्वी देखील रविचंद्रन अश्विनला खेळवायचं की नाही ही चर्चा क्रिकेट जाणकारांमध्ये सुरू झाली आहे. 

हेही वाचा : Mohammed Shami : पहिल्या कसोटीपूर्वीच रोहित शर्मासोबत मोहम्मद शमीही पर्थमध्ये होणार दाखल मात्र....

प्लेईंग ११ डोकेदुखी

पर्थची खेळपट्टी ही ट्रेडिशनली  वेगवान गोलंदाजांना साथ देते. इथं फिरकीपटूला विकेट घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. भारतीय संघात सध्या अश्विन, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर असे तीन फिरकीपटू आहेत. त्यातील प्लेईंग ११ मध्ये एकाच खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

अशा परिस्थितीत गेल्या कसोटीत सुमार दिसलेल्या अश्विनला बाहेर बसवलं जाऊ शकतं. मात्र बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीचं मात्र मत वेगळं आहे. त्याने अश्विनला खेळवलंच पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. ३८ वर्षाचा अश्विन हा गांगुलीच्या दृष्टीने जडेजा अन् सुंदरपेक्षाही जास्त फेव्हरेट आहे. 

गांगुलीची पसंती अश्विनला

रेव्हस्पोर्ट्सच्या बोरिया मजुमदारशी बोलताना गांगुली म्हणाला, 'इथं कोणतीही चर्चा नाही. अश्विन खेळलाच पाहिजे. तुमचा बेस्ट स्पिनर खेळायलाच हवा. कसोटी क्रिकेटमध्ये स्पेशलिस्ट खेळाडू महत्वाचा, ऑस्ट्रेलियाच्या संघात अनेक डावखुरे फंलंदाज आहेत. त्यासाठी अश्विन संघात हवाच. तो चांगला प्रभाव टाकू शकतो.' 

अश्विनसाठी मायदेशातील न्यूझीलंडविरूद्धची मालिका फारशी फलदायी ठरली नव्हती. तीन कसोटीत त्याला दुहेरी आकड्यातील विकेट टॅली साध्य करता आली नव्हती. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन यांनी १६ विकेट्स घेतल्या. तर अश्विनला ९ विकेट्सच घेता आल्या. 

हेही वाचा : IND vs AUS Virat Kohli : विराट कोहली भावनिक खेळाडू, तो दबावात.... ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने सुरू केला माईंड गेम

असं असतानाही गांगुलीने अश्विनला भारताचा बेस्ट स्पिनर असं संबोधलं आहे. तो म्हणाला की, 'जडेजा आणि सुंदर दोघेही चांगली बॅटिंग करतात. मात्र तुम्ही पहिल्या कसोटीत तुमच्या बेस्ट स्पिनरसोबतच गेलं पाहिजे. तुम्ही स्पेशलिस्ट बॅट्समन आणि बॉलरसोबतच जाणं अपेक्षित आहे. त्यामुळं माझी पसंती ही अश्विनला असेल.' 

भारतीय संघ 

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, रविंद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, विराट कोहली, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, केएल राहुल, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर 


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.