रुपाली बडवे, साम प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होत आहे, त्याआधी ४८ तास म्हणजेच, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यत प्रचार करण्याची संधी उमेदवारांना होती. या प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झंझावती सभा झाल्या.
यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटलांनी ६१ सभा गाजवल्या. प्रचार करणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वाधिक सभा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या. त्यांनी राज्य पिंजून काढत संपूर्ण राज्यभरात ६४ सभा घेतल्या.
छुपा प्रचार सुरू
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. सोमवार संध्याकाळपासून छुप्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रचारास सुरुवात झालीय. या प्रचारात उमेदवार कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतील. दरम्यान महिनाभरापासून राज्यात सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी, गावभेटींसह राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता.