Sayli Sanjeev: महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मतदान अगदी एका दिवसावर येऊन ठेपलेलं असताना प्रचारासाठी सेलिब्रेटी, इन्फ्ल्यूएन्सरही रिंगणात उतरल्याचं दिसलं. काही सेलिब्रेटींनी आपल्या सोशल मीडियावरून आपल्या आवडीच्या पक्षाला मतदान करण्याचं सांगितलं. तर काहींनी व्हिडीओ शेअर करत पक्षाला थेट पाठिंबा दिल्याचंही दिसलं. अशातच महायुतीला व्होट करा असं आवाहन करत व्हिडीओ पोस्ट केल्यानं अभिनेत्री सायली संजीव ट्रोल झाल्याचं दिसलं. राज्यात सोयाबीन हमीभावाचा मुद्दा तापत असताना शेतकऱ्यांना भाजप सरकारनं सुरक्षितता मिळवून दिल्याचं सांगत महायुतीला व्होट करण्याचं सांगितल्यानं कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी सायलीला प्रतिमा मलिन करू नकोस, UNfollow असं लिहित ट्रोल केल्याचं दिसलं. अनेकांनी शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील म्हणत आशाही व्यक्त केल्या आहेत.
भाजप सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारलंय. भाजप सरकार शेतकऱ्यांना दिलेली वचनं पूर्ण करत असल्यानं त्यांच्या अडचणी खऱ्या अर्थानं दूर होण्यास मदत होते. संपूर्ण कर्जमाफी, खतांवर करपरतावा, किसान सन्मान अशा योजनांमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं आहे. असं म्हणत यंदाच्या निवडणूकीत भाजपला मतदान करा असं आवाहन अभिनेत्री सायली संजीवनं केलं.
View this post on Instagram
सायली संजीवच्या या प्रचारात्मक व्हिडीओवर अनेकांनी तू अभिनेत्री म्हणून आम्हाला आवडतेस पण पक्षाचा राजकीय अजेंडा पुढे करत आपली प्रतिमा मलिन करून घेऊ नयेस.. सायली संजीव अभिनेत्री म्हणून तुझा रिस्पेक्ट करतो पण तू राजकारणात पडू नकोस अशा प्रकारच्या कमेंटस तिचे चाहते या व्हिडिओवर करत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर सकारात्मकही प्रतिसाद दिलाय. काहींनी जाहिरातीच्या नावाखाली काहीही वधवून घेताय.. शेतकरी खरंच सुखी आहे का एकदा कानोसा तरी घ्या.. असं म्हणत सुनावल्याचं दिसलं.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सायली संजीवने मनसेला पाठिंबा दिल्याचं दिसलं होतं. अमित ठाकरे यांचा फोटो शेअर करत निवडणुकीत उतरत असल्याबद्दल मी खूप आनंदी आहे असं म्हटलं होतं. आता महायुतीला पाठिंबा द्या म्हणत तिनं शेतकऱ्यांची बाजू आणि भाजपच्या योजना सांगत उचलून धरल्यानं चर्चा होत आहे.