आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दहाही फ्रेंचायझी आपल्या संघात कोणता खेळाडू घ्यायचा यासाठी मोर्चेबांधणी करून बसले आहेत. कोणत्या खेळाडूसाठी किती बोली लावावी याचा अंदाज बांधला गेला आहे. या लिलावात फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतकडे बहुतांश फ्रेंचायझींचं लक्ष आहे. पण इतका फॉर्मात असलेला खेळाडू दिल्ली कॅपिटल्सने सोडलाच कसा? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आयपीएल लिलावासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ऋषभ पंत व्यक्त झाला आहे. खरं तर सोशल मीडियावर त्याने सरळ काही लिहिलं नाही. पण एका कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी त्याच्यावर केलेल्या टिप्पणीचं त्याने उत्तर दिलं आहे. खरं तर पंतने गावस्कर यांचं म्हणणं बरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला रिटेन केलं नाही, कदाचित पैशांशी निगडीत प्रकरण असू शकतं.
गावस्कर यांची टिप्पणी ऐकल्यानंतर ऋषभ पंतही एक्स या सोशल मीडिया हँडलवर व्यक्त झाला आहे. कमीत कमी हे प्रकरण पैशांशी निगडीत नसू शकते, असं पंतने सांगितलं आहे. ऋषभ पंतने व्हिडीओखाली दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हे प्रकरण नक्कीच पैशांशी निगडीत नाही हे स्पष्ट होतं. व्हिडीओत सुनील गावस्करने एक आणखी आशा व्यक्त केली आहे. ऋषभ पंतसाठी दिल्ली कॅपिटल्स आरटीएम कार्ड वापरू शकते. एकतर ऋषभ पंत विकेटकीपर बॅट्समन आहे. तसेच कर्णधारपदही भूषवू शकतो असं गावस्कर यांनी पुढे सांगितलं. पण आता लिलावात स्पष्ट काय ते होईल.
मेगा लिलावासाठी ऋषभ पंतने बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली आहे. त्यात काही फ्रेंचायझींना डॅशिंग कर्णधाराची गरज आहे. खासकरून, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ससारख्या संघांची त्याच्यावर नजर आहे. त्यामुळे मोठी बोली लागली तर दिल्ली कॅपिटल्सला आरटीएम कार्ड वापरून ऋषभ पंतला संघात घेणं कठीण जाईल. दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडू रिटेन केले आहेत. अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रिस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अभिषेक पोरेलला 4 कोटी देऊन रिटेन केले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे 73 कोटी शिल्लक असून 2 आरटीएम कार्ड आहेत.