Silver Prices News : अलीकडच्या काळात चांदीच्या दरात (Silver Prices) मोठी वाढ होताना दिसत आहे. देशांतर्गत असो वा जागतिक बाजारपेठ सर्वत्रच चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. अलीकडेच देशांतर्गत बाजारात चांदीची किंमत 1 लाखाच्या जवळ पोहोचली होती. दरम्यान, पुढच्या काही दिवसात एमसीएक्सवर (MCX) चांदीची किंमत प्रति किलो 1.25 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
2024 च्या सुरुवातीपासून चांदीच्या किंमतीत प्रति औंस 10 डॉलरची वाढ दिसून आली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि यूएस फेडरल रिझव्र्ह बँकेने केलेली व्याजदर कपात याला चांदीच्या किमतीत वाढ कारणीभूत आहे. यामुळं सोन्यात जशी गुंतवणूक सुरक्षित मानली जाते तशीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे पाहिले जात आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये चांदीकडे आकर्षण वाढले आहे. भारतात सणासुदीच्या काळात चांदीला मागणी वाढल्याने किंमतीही वाढल्या आहेत. भारतातील चांदीच्या किमती आर्थिक आणि जागतिक कारणांमुळे प्रभावित झाल्या आहेत. 2008 च्या आर्थिक संकटाच्या काळात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली होती, तरीही त्यानंतर तीक्ष्ण पुनर्प्राप्ती झाली होती. 2011 मध्ये जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणे यालाही सुरक्षित गुंतवणुकीचा दर्जा मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
1981 मध्ये चांदी 2715 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती, जी 2010 मध्ये 27,255 रुपये प्रति किलो आणि 2020 मध्ये 63,435 रुपये प्रति किलोवर पोहोचली. यावरून असे दिसून येते की अस्थिरतेच्या वातावरणात चांदीची किंमत वाढते. 2024 मध्ये चांदीच्या किमतीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सोन्याच्या किंमतीत 32 टक्क्यांची वाढ जाली आहे.
चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते औद्योगिक मागणीत वाढ, चीनचे आर्थिक मदत पॅकेज, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने चांदीसाठी चांगले दिवस येतील. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मते, मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी, चांदीमधील गुंतवणूक सोन्याच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकते. 12-15 महिन्यांत, चांदी MCX वर 1.25 लाख रुपये प्रति किलो जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ सोसावी लागत आहे. अशातच पुन्हा चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्यानं सामान्य लोकांना चांदीची खरेदी करणं परवडणार नाही.