World Toilet Day 2024: अस्वच्छ आणि गलीच्छ शौचालय वापरल्याने होतात हे 5 गंभीर स्वरूपाचे आजार
Times Now Marathi November 19, 2024 10:45 PM

: जागतिक शौचालय दिन दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. समाजातील गरीब वर्गामध्ये स्वच्छता, जागतिक विकास आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2001 मध्ये वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनने याची सुरुवात केली होती. सन 2013 मध्ये, यूएन जनरल असेंब्लीने अधिकृतपणे यूएन डे म्हणून घोषित केले. त्यामुळे या दिवसाच्या निमित्ताने उघड्यावर शौच करणे किती घातक आहे? आणि अस्वच्छ तसेच गलीच्छ शौचालय वापरल्याने कोणकोणते गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.


आपण पाहतो की, शासनाने उघड्यावर शौचास जाणे आणि त्यामुळे होणाऱ्या संभाव्य समस्यांना प्रतिबंध घालण्यासाठी अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची उभारणी केली. पण खेदाची गोष्ट म्हणजे हे या सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता योग्यप्रकारे केली जात नसल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. लोकांच्या सोईसाठी बांधण्यात आलेले हे सार्वजनिक शौचालय अनेक आजारांचे घर बनत चालले असल्याकारणामुळे, सार्वजनिक शौचालय वापरण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो. घाण आणि दुर्गंधीमुळे ते वापरणे फार कमी लोकांना आवडते, परंतु कधीकधी परिस्थिती अशी बनते की ते वापरावे लागतात. ( and ways to prevent them)

अस्वच्छ शौचालयामुळे होणारे आजार
हानिकारक जिवाणू, विषाणू आणि परजीवी गलिच्छ शौचालयांमध्ये वेगाने वाढतात. या सूक्ष्मजंतूंच्या संपर्कात येण्यामुळे अनेक रोग होऊ शकतात

अतिसार
घाणेरड्या शौचालयांमुळे पसरणारा सर्वात सामान्य रोग म्हणजे अतिसार. अतिसारामुळे शरीरात निर्जलीकरण होते आणि अशक्तपणा जाणवतो.

UTI
अस्वच्छ शौचालय वापरल्यामुळे UTI होण्याचा धोका विशेषतः महिलांमध्ये खूप जास्त असतो. ज्यामध्ये वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, खाज सुटणे, वेदना होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

टायफॉइड
हा एक गंभीर जीवाणूजन्य संसर्ग आहे, जो दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो. ताप, डोकेदुखी, पोटदुखी आणि जुलाब ही त्याची लक्षणे आहेत. घाणेरडे टॉयलेट वापरल्याने हे जीवाणू हातातून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

हिपॅटायटीस ए
हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो दूषित पाणी किंवा विष्ठेद्वारे पसरतो. कावीळ, यकृताची सूज, ताप, थकवा आणि उलट्या ही त्याची लक्षणे आहेत. हा विषाणू गलिच्छ शौचालयाच्या पृष्ठभागावर काही काळ टिकू शकतो, जिथून तो तुमच्या शरीरात प्रवेश करतो.

प्रोस्टेटायटिस रोग
अस्वच्छ शौचालयामुळे पुरुषांमध्येही प्रोस्टेटायटीस रोगाची समस्या उद्भवू शकते.

त्वचा रोग
घाणेरड्या शौचालयात बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्याने दाद आणि खरुज यांसारखे त्वचेचे संक्रमण होऊ शकते. तसेच, बॅक्टेरिया हातांद्वारे चेहऱ्यावर पोहोचू शकतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या देखील होऊ शकते.

गलिच्छ शौचालय टाळण्यासाठी मार्ग
आजकाल टॉयलेट सीट पाश्चिमात्य डिझाइनची असल्यामुळे या समस्या अधिक गंभीर बनत चालल्या आहेत. केवळ सार्वजनिक शौचालय नव्हे तर आपले घरातील शौचालय देखील अस्वच्छ राहिल्याने आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे अस्वच्छ शौचालयापासून होणारे आजार टाळण्यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात ( ) याबद्दल जाणून घ्या.

स्वच्छतेची काळजी घ्या
शौचालय वापरल्यानंतर नेहमी साबणाने हात धुवा. आपल्या बोटांच्या दरम्यान आणि नखांच्या खाली साफ करण्यास विसरू नका. त्याचप्रमाणे शौचालयाचा वापर करताना नेहमी स्वच्छ पाणी वापरा.

नियमित साफसफाई
शौचालयाची नियमित साफसफाई करणे फार महत्वाचे आहे. टॉयलेट सीट, फ्लश, भिंती आणि फरशी पूर्णपणे स्वच्छ करा. यासाठी जंतुनाशक वापरा. हे जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यास मदत करते.

टॉयलेट स्प्रे किंवा कव्हर वापरा
जर तुम्ही सार्वजनिक शौचालयचा वापर करणार असाल तर टॉयलेट स्प्रे किंवा टॉयलेट सीट कव्हर वापरा.

डस्टबिनचा वापर
टॉयलेट पेपर किंवा गलिच्छ पॅड इत्यादी टाकण्यासाठी डस्टबिनचा वापर करा. उघड्यावर कचरा टाकू नका.

कमी ठिकाणी स्पर्श करा
शौचालयात आवश्यक असलेल्या गोष्टींनाच स्पर्श करा. शक्य तितक्या कमी गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. खास करून सार्वजनिक शौचालय वापरताना याची काळजी घ्या.

हातमोजे वापरा
शौचालय वापरताना डिस्पोजेबल हातमोजे वापरा. यामुळे तुमचे हात घाण होण्यापासून वाचतील.

झाकण बंद करा आणि फ्लश करा
टॉयलेट फ्लश करण्यापूर्वी झाकण बंद करा. यामुळे टॉयलेटमधून जंतू निघणार नाहीत.

इंडियन स्टाईल टॉयलेट
सार्वजनिक शौचालय वापरताना, भारतीय शैलीतील आसन असलेल्या शौचालयाची निवड करा. यामध्ये संसर्गाचा धोका कमी असतो.

वरील या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही संभाव्य आरोग्य समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतात.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.