देवाला प्रसाद चालतो,'विनोद' नाही; विनोद तावडेंच्या प्रकरणानंतर मराठी लेखकाची एकाच वाक्याची 'अध्यात्मिक' पोस्ट चर्चेत
अपूर्वा जाधव November 20, 2024 01:13 AM

Vinod Twade : विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Elections) प्रचाराच्या तोफा थंडावल्याच्या दुसऱ्याच दिवशी विरारमध्ये मोठा गोंधळ झाला. भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनीच पैसे वाटल्याचा दावा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे विनोद तावडे आणि राजन नाईक (Rajan Naik) यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि क्षितीज ठाकूरांनी (Kshitij Thakur) केली आहे. विरारच्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही बरंच तापलंय. याच सगळ्यामध्ये मराठी लेखकाची अगदी एकाच वाक्यात सूचक पोस्ट केली आहे. 

अरविंद जगताप यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन या राड्यानंतर ही पोस्ट शेअर केली आहे. अरविंद जगतापांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. अध्यात्मिक, देवाला प्रसाद चालतो, विनोद नाही... अशी पोस्ट अरविंद जगतापांनी केली आहे.यावर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.  पण या पोस्टमध्ये अरविंद जगतापांनी अध्यात्मिक असाही शब्द वापरला आहे. 

हेमंत ढोमेचीही पोस्ट चर्चेत

दरम्यान या प्रकरणावर अभिनेता हेमंत ढोमेही सूचक पोस्ट केली होती. हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे… ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! तसेच त्याने #कोणाचा_गेम_कोणाला_फेम असं हॅशटॅगही वापरलं आहे. 

विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर नालासोपारा मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय. विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये धडकले. त्यांनी थेट विनोद तावडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. काही काळ तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही पाहायला मिळाली.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली.  त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आल्यानंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना प्रश्न विचारत थेट 4 तास हॉटेलमध्येच रोखून धरलं होतं. त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्याच गाडीतून विनोद तावडे हॉटेलबाहेर निघाले.

ही बातमी वाचा : 

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.