Yugendra Pawar: बारामतीमध्ये मोठी घडामोड, श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
Saam TV November 19, 2024 10:45 PM
मंगेश कचरे, बारामती

बारामतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीत शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. श्रीनिवास पवार हे शरयू मोटर्सचे कंपनीचे मालक आहेत. श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांकडून शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन केले. तक्रारीनंतर तपास केला मात्र त्या ठिकाणी काही आढळून आले नाही अशी माहिती प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. या सर्च ऑपरेशनमुळे बारामतीमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

बारामती तालुक्यातील मेडद गावात असलेल्या शरयू मोटर्सवर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची आहे. श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार आणि अजित पवार हे काका -पुतणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये हे दोघे जण आमने सामने आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात हे सर्च ऑपरेशन करण्यात आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या सर्च ऑपरेशनबाबत बारामतीचे विभागाचे मुख्य निवडणूक निर्णय वैभव नावडकर यांनी प्रतिकिया दिली. त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात काही तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या नेमण्यात आलेल्या एका विशिष्ट पथकाकडून विविध ठिकाणी तपासण्या करण्यात येतात. त्याच पद्धतीने शरयू टोयाटो कंपनीवर देखील तपास करण्यासाठी पथक गेले होते. त्या ठिकाणी कोणतीही रक्कम अथवा काहीही आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.