'निर्मिती संवाद' कार्यशाळेचे आयोजन, मराठी चित्रपट निर्माते,दिग्दर्शक,कलाकारांचा भरघोस प्रतिसाद
जयदीप मेढे November 19, 2024 10:43 PM

Marathi Movie : ‘कथा' हा चित्रपटाचा आधारस्तंभ असतो. तो भक्कम हवा. फक्त पैसे आहेत, म्हणून निर्माते होऊ नका. चित्रपट माध्यमाचा आणि व्यवसायाचा अभ्यास करा." असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांनी राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना दिला. 'मेघराज राजेभोसले फाऊंडेशन' आयोजित मराठी चित्रपट निर्मात्यांसाठीच्या 'निर्मिती संवाद' या एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या संकुलात नुकत्याच पार पडलेल्या या कार्यशाळेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या 400 हून अधिक चित्रपट निर्मात्यांचा यात सहभाग होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, संकलक, वितरक, थिएटर मालक, वाहिन्यांचे कार्यकारी अधिकारी, ओटीटी तज्ञ अशा अनेक विषयतज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

तंत्रज्ञानाच्यादृष्टीने मराठी चित्रपट पुढारलेले नाहीत - तेजस्विनी पंडित

सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, ‘सिनेमा फ्लॉप होत नाही, तुमचे बजेट फ्लॉप झालेले असते. बजेटवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. शासनानेही निर्मात्यांना आर्थिक साह्य देण्याबरोबर इतरही बाबींसाठी मदत करावी.’ तेजस्विनी पंडित म्हणाली की, ‘निर्मात्यांनी समूहनिर्मितीचा प्रयोग करावा ग्लॅमर नाही, तंत्रज्ञानाच्यादृष्टीने मराठी चित्रपट पुढारलेले नाहीत आणि लार्जर देन लाईफ असे मराठीत काही नसते, या सर्व आक्षेपांना उत्तरं देणे शक्य होईल.’     

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनीही या कार्यशाळेत विचार मांडले. कथेच्या निवडीपासून ते चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांसह शासकीय अनुदान, टिव्ही चॅनल्स, ओटीटी आणि विविध हक्क विक्रीसंबंधी वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा  झाल्या.

राज काझी यांनी विषयवार आरेखन केलेल्या या कार्यशाळेत सुनील सुकथनकर, किरण यज्ञोपवित, कांचन अधिकारी, शशांक शेंडे,  संजय ठुबे, नीलेश नवलाखा, उपेंद्र सिधये, सुरेश देशमाने, राहुल रानडे, संजय दावरा, युगंधर देशपांडे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर, गणेश गारगोटे, फिल्मसिटीचे पंकज चव्हाण, हेमंत गुजराती, संतोष रासकर, किरण रोंगे, गिरीश जांभळीकर, अन्वय कोल्हटकर, शौकत पठाण, शाम मळेकर, सुरेश तळेकर, आदित्य देशमुख, योजना भवाळकर-भावे आदी मान्यवरांनी विविध विषयांवर  मार्गदर्शन केले.

ही बातमी वाचा : 

Madhuri Dixit : करिअरच्या शिखरावर असताना लग्न करुन परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला? माधुरी म्हणाली...

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.