Nagpur Politics: दगडफेक झाल्यावर गाडी का थांबवली?, अनिल देशमुखांवरील हल्ल्याप्रकरणी भाजप नेत्याने उपस्थित केले प्रश्न
Saam TV November 19, 2024 11:45 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. अनिल देशमुख प्रचारसभा आटोपून घराच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यांच्यावर सध्या नागपूरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. अनिल देशमुख यांच्या समर्थकांनी याप्रकरणी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. विरोधी पक्षाकडून याप्रकरणी भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. अशामध्ये भाजपचे नेते परिणय फुके यांनी या हल्ल्याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत अनिल देशमुख यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत व्यक्त केले आहे.

परिणय फुके यांनी सांगितले की, 'दगडफेक झाल्यावर गाडी का थांबवली? १० किलोचा दगड आहे. पुढच्या कशावर पडल्यावर गाडीच्या बोनेटवर पडला. या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. देशमुख नावाचा बॉडीगार्ड सोबत असतो पण यावेळी तो मागच्या गाडीत का होता? ही फेक दगडफेक आहे. सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे. सोंग करून बेल मिळवली आहे.'

तसंच, 'काटोलचा जनतेकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. लोक या दिशाभूलला बळी पडणार नाही. पोलिस चौकशी करत आहेत. यातील माझा प्रश्नसुद्धा पोलिसांना पत्रातून विचारणार आहे. पोलिस यातून खुलासा करतील. निवडूक डोळ्यासमोर ठरवून हे का होत आहे? माझा संशय आहे. मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके, नाना पटोले, गोपाल अग्रवाल, विजय वडेट्टीवार, तुमसरचे चरण वाघमारे हे सुद्धा अशापद्धतीने हल्ले झाल्याचा बनाव करू शकतात.' असाही गंभीर आरोप परिणय फुके यांनी केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.