भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. नालासोपारा मतदारसंघात तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. नालासोपारा पूर्व येथे असलेल्या विवांता हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
यानंतर बविआचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी येथे जाऊन पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या घटनेचे व्हीडिओ वृत्त वाहिन्या तसेच इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.
विवांता हॉटेलमध्ये हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला होता.
या प्रकारानंतर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "नालासोपारा येथे मतदानासंदर्भात नियमांचे पालन व्हावे यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. महायुतीला मिळत असलेल्या व्यापक पाठिंब्यामुळे हताश झालेल्या विरोधकांनी असे कोणताच पाया नसलेले आरोप करुन त्याला एक निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी माझी विनंती आहे."
या व्हीडिओत लोक हात उंचावत काहीतरी जोरात बोलत आहेत तसेच वृत्तवाहिन्यांचे माईकही दिसत आहेत.
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक्स प्लॅटफॉर्मवर टीका केली आहे.
ते लिहितात, “भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!”
या व्हीडिओवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. ते एक्स प्लॅटफॉर्मवर लिहितात, "भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरार येथील एका हॉटेल मध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यामांवर फिरत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकून ठेवण्यासाठी आणि निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विनोद तावडे यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे."
बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली, "भाजपाच्या नेत्यांनी विनोद तावडे तिकडे 5 कोटी रुपये घेऊन आल्याचं कळवलं होतं. आधी एवढे मोठे नेते हे लहान काम करणार नाहीत असं वाटलं. पण नंतर इथे येऊन आम्ही पाहिलं. आम्हाला काही डायऱ्या सापडल्या, त्यात काय आहे हे तपासत आहोत. ते आले तेव्हा हॉटेलचे सीसीटीव्ही बंद असल्याचं लक्षात आलं. ते आता सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेल प्रशासनाचीही चौकशी झाली पाहिजे."
बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे, "भारतीय जनता पक्षाने सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचं या ठिकाणी दिसतंय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे अशक्य केले जात आहे आणि पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेला विनोद तावडे सारखा नेता पैशांसोबत हॉटेलमध्ये पकडल्या जातो ही लाजीरवाणी गोष्ट आहे. एकीकडे धनदांडगे आणि जात दांडग्या पक्षांकडून पैशाचा पाऊस पाडून निवडणुक फिरवण्याचा प्रयत्न होतोय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घामाच्या कष्टाच्या पैशाने निवडणूक लढत आहेत. पण आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आम्ही या धनदांडग्या पक्षांचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आमच्या उमेदवारांवर हल्ले होत असताना हातावर हात ठेऊन बसलेल्या पोलीस प्रशासनाचाही निषेध करतो. जनता 20 तारखेला या धनदांडग्या पक्षांना योग्य धडा शिकवेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)