ढिंग टांग : माझी निवडणूक, माझी जबाबदारी..!
esakal November 20, 2024 11:45 AM

माझ्या लाडक्या मतदार बंधू आणि भगिनींनो, हल्ली कश्शालाही लाडका हे विशेषण जोडायची लाडकी फ्याशन असल्यामुळे मायना बदलला आहे. तसे आपण काही एकमेकांचे लाडकेबिडके नसतो. साधी तोंडओळख नसते, पण तरीही बिनदिक्कत लाडके, दोडके म्हणण्याची जनरीत पडून गेली आहे. असो.

एक अभूतपूर्व अशी जबाबदारी मतदारांच्या खांद्यावर आली आहे. आज आपल्याला (किनई) मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. आज आपला सण आहे. लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीत आज मतदाराला दैवतासमान महत्त्व येते. इलेक्शनचा हा दिवस. तुम्हा सर्वांना इलेक्शनोत्सवाच्या शुभेच्छा.

आजचा एक दिवस आणि पुढील तीन दिवस तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. आज मतदान हेच श्रेष्ठदान, आणि तेवीस तारखेला आपल्या मताचे नेमके काय (भजे) झाले, हे पाहायचा दिवस. या तीन दिवसात व्रतस्थ राहण्याची वेळ येणार असल्याने काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. त्यापैकी काही महत्त्वाची पथ्ये येथे देता आहो :

१.मतदार हा कितीही राजा असला तरी त्याला रांगेतच उभे राहावे लागते. रांग मोडणाऱ्यास खाकी वर्दीतील पोलिस बांधव लोकशाहीचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगतात.

२.रांगेत उभे असलेल्या मतदाराने आपले मतदानकेंद्र आणि बूथ सुनिश्चित करुन घ्यावे. ऐनवेळेला आपली रांग चुकल्याचा साक्षात्कार होणे वेदनादायी असते. आयुष्यात अनेकदा रांगा चुकतात किंवा आपला नंबर आला की खिडकी हापटून बंद होते. अशा घटना मनावर घेऊ नयेत. लोकशाही जगावी यासाठी थोडे क्लेश सहन करायलाच हवेत.

३. मतदानाच्या रांगेत का कुणास ठाऊक, पण काही जणांना विनोद फार सुचतात. कश्शावरही विनोद करुन आपण वातावरण प्रफुल्लित करुन ऱ्हायलो आहो, असा त्यांचा भ्रम असतो. आपणही माफक हसून तो उपक्रम चालू ठेवावा. आपले काय जाते?

४. मतदानासाठी बाहेर पडताक्षणी तुमच्याकडे बघून किमान तीन-चार जण उगीचच हसतील. नमस्कार वगैरे करतील. आपणही करावा! त्याने काहीही बिघडत नाही.

५. मतदानकेंद्रावर जाताना मोबाइल फोन घरीच ठेवावा. कां की मतदानाच्या ठिकाणी फोन नेण्यास सक्त मनाई आहे. सूचना ही नव्हे! ती सर्वांना माहीत आहे. सूचना ही की, मोबाइल फोन घरी ठेवताना स्विच ऑफ करुन दडवून ठेवावा, आणि पत्नीस मतदानाच्या उत्सवासाठी स्वत:हून न्यावे! यामुळे फोन सुरक्षित राहातो!!

६. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याने इशारा करताच हाताची पाचही बोटे पालथी समोरील मेजावर ठेवावीत. मतदार राजा अथवा राणी असली तरी कुठल्या बोटास शाई लावावी, हेसुद्धा त्याला ठरवता येत नाही. तसेच हा मेंदी काढण्याचा किंवा नखे रंगवण्याचा कार्यक्रम नाही, हेही लक्षात असू द्यावे. त्यामुळे ‘शाई नीट लावा’, ‘शी अशी काय लावली?’, ‘उजव्या की डाव्या?’ असल्या प्रतिक्रिया नोंदवू नयेत.

७. मतदान करुन झाल्यावर सेल्फी काढण्यास काहीच हरकत नाही. एकेकाची हौस असते. पण आपले मत बहुमोल असल्याने, आपले मतदान ही ‘ब्रेकिंग न्यूज’ आहे, असे समजून लागलीच ‘इन्स्टा’वर टाकण्याचे काही कारण नसते. आपल्या मतदानामुळे कोट्यवधी इतर मतदारांना प्रेरणा मिळेल, अशी समजूत बाळगू नये.

८. मतदानाच्या दिवशी अनेकांना सुटी असते. पण ती मतदानासाठी असते, लोणावळा, महाबळेश्वर, म्हैसमाळ, भंडारदरा, चिखली आदी ठिकाणी जाण्यासाठी नसते. मतदान करा, लोकशाही टिकवा, पर्यटन नव्हे!!

९. मतदान झाले तरी सावध रहा, अशा बेसावध क्षणीच एग्झिट पोलवाले गाठतात, अशी वदंता आहे. हे एरवी कुठे दिसत नाहीत, पण असतात!

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.