नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
संदीप जेजुरकर November 20, 2024 12:13 PM

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी सात वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgav Vidhan Sabha Constituency) निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आला आहे. मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली आणि EVM मशीनच बंद पडले आहे. 

नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे आमदार सुहास कादे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक, अपक्ष समीर भुजबळ आणि अपक्ष डॉ. रोहन बोरसे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार गणेश धात्रक व सुहास कांदे यांच्यासह अकबर सोनावाला, गौतम गायकवाड, आनंद शिगारे, फिरोज करींम, वाल्मीक निकम, वैशाली व्हडगर, सुनील सोनवणे, हारुण पठाण आदी चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला होता. मात्र चौघा प्रमुख उमेदवारांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी दहा अपक्षांमुळे होणाऱ्या मतांच्या विभागणीमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. मात्र मतदानाला सुरुवात होताच नांदगावमध्ये चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. 

निवडणूक आयोगाचा गलथान कारभार

नांदगाव मतदारसंघातील 164 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तब्बल दोनदा बंद पडले आहे. न्यू. इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावरील हा प्रकार घडला आहे. मतदार तब्बल दोन तासांपासून मतदानासाठी ताटकळत उभे राहिल्याचे दिसून येत आहे. मतदारांच्या बोटाला शाई लावली असून मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने मतदारांना आपला हक्क बजावता आलेला नाही. यामुळे निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आला आहे. 

नांदगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

दरम्यान, नांदगाव विधानसभेसाठी 1 लाख 78 हजार 600 पुरुष व 1 लाख 64 हजार 452 स्री, अन्य 4 असे एकूण 3 लाख 45 हजार 56 मतदार आपल्या मतदानाचा हक्क 341 मतदान केंद्रांवर बजावणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सशस्त्र सेना बलाच्या जवानांच्या कंपनीसह 1 उपअधिक्षक, 5 पोलीस निरीक्षक, 20 सपोनि व उपनिरीक्षक, 218 पोलीस, 17 महिला पोलीस, 261 गृहरक्षक दलाच्या दलाच्या जवानांचा समावेश आहे.  

आणखी वाचा 

Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.