Vinod Tawde : पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना विनोद तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण…
GH News November 20, 2024 02:13 PM

“माझ्याकडे 5 कोटी होते, असं सुप्रिया सुळे बोलल्या पण त्या खोटं बोलल्या. त्यांनी आधी माझे पाच कोटी रुपये परत द्यावेत” असं विनोद तावडे म्हणाले. शरद पवार यांनी, विनोद तावडे एक चांगले गृहस्थ आहेत, आरोप सिद्ध झाल्याशिवाय बोलणार नाही असं म्हटलय. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “शरद पवार हे परिपक्व नेते आहेत. सिनियर आहेत. ते मला जवळून ओळखतात. मी अशा गोष्टीत असू शकत नाही हे त्यांना माहित आहे, मी त्यांचे आभार मानतो” “मी काल नालासोपाऱ्याला जाणार हे कोणाला माहित नव्हतं. कारण मी वाडामधून निघताना आमचे उमेदवार राजन नाईक यांना फोन केला. कसं चाललय असं मी विचारलं. त्यांनी सांगितलं, आम्ही कार्यकर्ते बसलो आहोत, चहाला या. मला वाटलं, 10-12 कार्यकर्ते आहेत, म्हणून मी तिथे गेलो. यात कोणतही कारस्थान नाही, आपसातल भांडण नाही” असं विनोद तावडे म्हणाले.

“विरोधी पक्षाने एका राजकीय घटनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, कारण ते हरत आहेत. निवडणूक आयोग, पोलिसांना काही मिळालं नाही” असं विनोद तावडे म्हणाले. संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे इशारा केला, त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “हे चुकीचं आहे. मी तिथे जाणार हे कोणाला माहित नव्हतं. दोन मिनिटात अचानक तिथे जायचं ठरलं” भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत क्रिप्टो करन्सी वापरल्याचा आरोप केला. या संबंधीच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.

सुप्रिया सुळेंच्या क्रिप्टो करन्सीच्या प्रकरणावर म्हणाले…

ही AI जनरेटेड ऑडिओ क्लिप असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विनोद तावडेंच प्रकरण दाबण्यासाठी भाजपाने हे समोर आणलं असं बोललं जातय. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “सुधांशु त्रिवेदी हे ठोस माहिती असल्याशिवाय असे आरोप करणार नाहीत. मी पकडलो गेलो नाही. पैसे मिळालेच नाहीत, त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा विषयच येत नाही.”

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.