बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना तिरुपती देवस्थानची सूचना
वृत्तसंस्था / तिरुपती
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या व्यवस्थापनाने बिगर हिंदू कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना केली आहे. अशा कर्मचाऱ्यांनी एकतर बदली स्वीकारावी किंवा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, असे त्यांना कळविण्याचा निर्णय व्यवस्थापनाकडून घेण्यात आला असून तसा प्रस्तावही व्यवस्थापनाच्या बैठकीत संमत करण्यात आला आहे. देवस्थानचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी मंगळवारी ही माहिती दिली. देवस्थानच्या लाडू प्रसादासाठीही विनाभेसळ शुद्ध तूप उपयोगात आणले जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
देवस्थानात काम करणाऱ्या बिगर हिंदू कर्मचाऱ्यांची संख्या किती याची त्यांनी माहिती दिली नाही. तथापि, सूत्रांच्या महितीनुसार देवस्थानात थेट नियुक्ती असलेले 7 हजारांहून अधिक कर्मचारी असून त्यांच्यापैकी 300 हून काहीसे अधिक बिगर हिंदू कर्मचारी आहेत. याशिवाय देवस्थान साधारणत: 14 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांकडूनही सेवा घेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अनेकांचा पाठिंबा
देवस्थान व्यवस्थापनाच्या या निर्णयाला अनेक क्षेत्रांमधील मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. विशेषत: तिरुपती देवस्थान कर्मचारी संघटनांनी हा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले असून तो आंध्र प्रदेश धर्मादाय कायदा, तसेच तिरुपती तिरुमला देवस्थान कायद्यानुसार आहे, असे या कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. व्यवस्थापनाने संमत केलेला प्रस्ताव त्वरित आणि पूर्णपणे लागू करण्यात यावा, अशी मागणी या कर्मचारी संघटनांनी केली आहे. कर्मचारी संघटनांचे समर्थन मिळाल्यामुळे हा आदेश लागू करण्याचा देवस्थानचा मार्ग मोकळा झाला आहे.
पूर्वीच केली होती घोषणा
आंध्र प्रदेशमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर होऊन तेलगु देशम, जनसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर तिरुपती देवस्थान व्यवस्थापनाच्या अध्यक्षस्थानी बी. आर. नायडू यांची निवड झाली. या देवस्थानात केवळ हिंदू कर्मचारीच असावेत, असे प्रतिपादन त्यांनी त्याचवेळी केले होते. आता व्यवस्थापनाने तसा प्रस्ताव संमत केला आहे.
तीन वेळा कायद्यात सुधारणा
तिरुपती देवस्थानात केवळ हिंदू कर्मचाऱ्यांनाच काम करण्याची अनुमती देण्यात यावी, अशा अर्थाची सुधारणा या देवस्थानच्या कायद्यात आतापर्यंत तीनदा करण्यात आली आहे. तरीही आतापर्यंत अनेक बिगर हिंदू कर्मचारी या देवस्थानच्या कमचारीवर्गात समाविष्ट करण्यात आले होते. आता देवस्थानने या कायद्याची काटेकोर क्रियान्वयन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुपासंबंधीही निर्णय
देवस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीत या देवस्थानच्या लाडू प्रसादासंबंधीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हे लाइt बनविण्यासाठी यापुढे केवळ गाईचे शुद्ध तूपच उपयोगात आणण्यात येणार आहे. तसेच लाडूंसाठी लागणाऱ्या इतर पदार्थांचीही शुद्धता सुनिश्चित केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी यासंबंधी मोठा वाद निर्माण झाला होता. प्रसादाच्या लाडूंसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या तुपात गाय आणि डुकराची चरबी, तसेच मत्स्यतेलाची भेसळ आढळून आल्याचा अहवाल देशातील चार अधिकृत प्रयोगशाळांनी दिला होता. त्यामुळे तिरुपती भगवान व्यंकटेश्वरांच्या जगभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अशा भेसळीचा निषेध करताना मागच्या जगनमोहन रे•ाr सरकारला दोष दिला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहचले आहे. देवस्थानच्या व्यवस्थापनात परिवर्तन झाल्यानंतर अशा भेसळयुक्त तुपाचा उपयोग थांबविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. आता या घोषणेला अधिकृत प्रस्ताव संमतीचे बळ मिळाले आहे. यापुढे देवस्थान प्रसादाच्या पदार्थांची शुद्धता स्वत: सुनिश्चित करणार आहे. त्यासाठी देवस्थान स्वत:च्या प्रयोगशाळेचे अत्याधुनिकीकरण करणार आहे. यापुढे प्रसादाच्या पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही, हे सुनिश्चित केले जाईल, असे देवस्थानाने स्पष्ट पेले आहे.
कायदा कठोरपणे लागू करणार
ड देवस्थानात केवळ हिंदू कर्मचाऱ्यांनाच स्थान देण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय
ड हा निर्णय तिरुपती तिरुमला देवस्थान कायद्यानुसार वैध असल्याची स्पष्टता
ड कायदा असूनही आतापर्यंत बिगर हिंदू कर्मचाऱ्यांच्या होत होत्या नियुक्त्या
ड प्रसादाचे लाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची शुद्धता सुनिश्चित होणार