नाशिक : विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) 288 जागांसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला दोन तास होत नाही तोच नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Vidhan Sabha Constituency) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी आक्रमक झालेल्या सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिले.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अचानक अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला होता. मतदारांना जावू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा समीर भुजबळांनी घेतला होता. यानंतर घटनास्थळी सुहास कांदे दाखल झाले. यावेळी दोन्ही गटामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
सुहास कांदे यांनी आक्रमक पवित्रा घेत समीर भुजबळांना आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर काही काळ दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील अरे, तुझ्यासारखे 56 पाहिले, असे म्हणत सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिले. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काही वेळाने निवडणूक आयोगाने पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये थांबविलेल्या मतदारांची चौकशी व बॅग तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या बसमधील चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचे सिध्द झाले. आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आम्हाला वेठीस धरले जात असल्याचा मतदारांनी आरोप केला. अडविलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला देखील असल्याचे समजते. निवडणूक आयोगाने चौकशी केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले. तर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या