आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा November 20, 2024 04:13 PM

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता यावर सुहास कांदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सुहास कांदे म्हणाले की, काही ऊसतोड कामगार राज्यभर कामासाठी साखर कारखान्यावर कामाला जातात. ते मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आले होते. त्यांच्या मुकादमाने त्यांच्य्साठी एकत्रित जेवणाची व्यवस्था केली होती. समीर भुजबळ व त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. त्या मतदारांच्या गाड्याही अडवल्या आणि फोडल्या. याबाबत माहिती मिळताच मी त्या ठिकाणी पोहचलो.  त्यावेळी समीर भुजबळांनी त्यांची गाडी आडवी घालून त्यांना रोखलं होतं. त्यांना मतदानापासून रोखले जात होते म्हणून मी त्यांच्या मदतीला धावून गेलो आणि निवडणूक आयोग व पोलिसांकडे तक्रार केली. हे मतदार नसतील तर त्यांना अटक करा, असे मी आयोगाला सांगितले. यानंतर निवडणूक आयोगाने शहानिशा केली आणि मतदारांना सोडून दिले, असे सुहास कांदे यांनी सांगितले. 

मी समीर भाऊंचे नाव घेऊन धमकी दिली नाही

सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत विचारले असता सुहास कांदे म्हणाले की, समीर भाऊंचे नाव घेऊन मी धमकी दिली नाही, ते चुकीचं व्हायरल होत आहे. तिथे आमच्या एका माणसाला मारत होते, मी त्यांना म्हटलं की त्याचा मर्डर होईल. एका मुकादमाकडे शंभर, दीडशे लोक काम करतात. नांदगाव तालुक्यातील सर्व मुकादमांनी मिळून एका ठिकाणी जेवण ठेवलं होतं, म्हणून ते लोक आले होते. नांदगाव विधानसभा मतदारसंघ मागासलेला आहे. ते मतदार ऊस तोडीला गेले होते, त्यांना वाटलं आपलं कर्तव्य निभवावं, म्हणून ते आले होते. मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो, ज्या मतदारांना अडवलं गेलं, मतदारांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं होतं, शिव्या दिल्या गेल्या, मारहाण केली, गर्भवती महिलेला शिवीगाळ केली. पोलिसांना विनंती करतो की, काहीतरी चुकीचं घडण्याचं मला जाणवत आहे, माझी विनंती आहे की आपण लक्ष घाला, असे सुहास कांदे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.