बारामतीत दमदाटी करून मतदान, युगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार यांचा अजितदादांच्या कार्यकर्त्यांवर आरोप
Marathi November 20, 2024 06:24 PM

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू आहे. राज्यभरात शांततेत सुरू असलेल्या मतदानाला काही ठिकाणी मात्र गालबोट लागले आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारीही मिळाल्या आहेत. बारामतीमध्येही असाच प्रकार उघडकीस आला असून दमदाटी करून मतदान करून घेतले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार यांनी केला आहे.

बारामती मतदारसंघातील मतदान केंद्रावर आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली जात आहे. मतदानाला येणाऱ्या मतदारांना खाणाखुणा केल्या जात आहेत. इशारे केले जात आहेत. आम्ही आक्षेप घेतल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप शर्मिला पवार यांनी केला.

मोहसीन नावाचा आमचा कार्यकर्ता असून तो इथे काम करत होता. त्याने फोन करून आम्हाला बोलवून घेतले. इथे मतदान चिठ्ठीवर घड्याळाचे चिन्हाचे स्टॅम्प लावल्याचे आढळून आले आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार देणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

हे सर्व घड्याळाचे कार्यकर्ते असून मोहसीनला बघुन घेईन अशी धमकी त्यांनी दिली. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्याकडून सीसीटीव्ही फुटेज डीलिट केली जाण्याची शक्यता आहे. आम्ही पोलिसांशीही बोललो असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केल्याचेही शर्मिला पवार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.