सोमाटणे, ता. ३ ः पुणे-मुंबई महामार्गालगत सोमाटणे येथे गॅस वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढली असून, खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे-मुंबई महामार्गालगत सोमाटणे येथे गॅसवाहिनी टाकण्यासाठी संबंधित कंपनीने गेल्या नऊ महिन्यांपूर्वी रस्ता न खोदता भूमीगत खोदकाम काम सुरू केले. शंभर मीटर अंतराच्या कामासाठी नऊ महिने लागले तरीही काम अपूर्णच आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कंपनीने परंदवडी व शिरगावकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यालगत मोठे खड्डे खोदले आहेत. या खड्ड्यातून निघालेली माती दूर न टाकता सेवा रस्त्यालगत टाकल्याने सेवा रस्ता अरुंद झाला असून, दोन दिवसांपासून सोमाटणे चौकात पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी सात ते आठ, दुपारी बारा ते एक व संध्याकाळी सहा ते आठ दरम्यानच्या काळात रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढते. यावेळेस महामार्गावर सोमाटणे चौकापासून दोन्ही बाजूला दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक पोलिस कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु सकाळ-संध्याकाळ वाहनांची संख्या वाढल्याने त्यांना वाहतूक कोंडी सोडवण्यात मर्यादा येतात. ही कोंडी सोडवण्यासाठी तातडीने रस्त्यालगत खोदलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी तळेगाव-चाकण कृती समितीचे दिलीप डोळस, अध्यक्ष नितीन गाडे, प्रमोद दाभाडे, दीपक टोणगे आदींसह सोमाटणे ग्रामस्थांनी केली आहे.
PNE24U67777
---