नालासोपारा, ता. ३ (बातमीदार) : वसंत नगरी अग्रवाल येथील ४१ इमारतींवर सुरू केलेल्या कारवाईविरोधात ठाकरे गटाची युवासेना आक्रमक झाली आहे. या बांधकामाला जबाबदार तत्कालीन पालिका अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी युवासेनेचे अतुल मोटे यांनी केली आहे.
नालासोपारा पूर्व अग्रवाल परिसरातील सर्व्हे २२ ते ३४ आणि ८४ हा भूखंड सांडपाणी प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव होता. या भागात वस्ती वाढल्यानंतर आरक्षण हटवून एसटीपी प्लांटसाठी तो आरक्षित केला होता. त्यानंतर या भूखंडावर अतिक्रमण झाले. आता या ४१ अनधिकृत इमारतींवर महापालिकेने निष्कासन कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे बाराशेपेक्षा अधिक कुटुंबे बेघर होत आहेत. या इमारतींना पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी संरक्षण दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे पक्षाच्या युवासेनेने केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी अतुल मोटे यांनी केली आहे.