सेवानिवृत्त सैनिकांचे
गहाळ पाकीट केले परत
खेडमधील प्रकार; सीमा जाधवांचा प्रामाणिकपणा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : खेड नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी सीमा जाधव यांना शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूल परिसरात स्वच्छतेचे काम करताना एका बाकड्यावर पैशांचे पाकीट आढळले. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मदतीने ते पाकीट मालक असलेले सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडे सुपूर्द करत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
जाधव यांच्या प्रामाणिक कृतीचे खेडेकर यांच्यासह तालुक्यातून कौतुक होत आहे. त्या साफसफाईचे काम करताना त्यांना पाकीट सापडले. त्यांनी तातडीने माजी नगराध्यक्ष खेडेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राज वैभव पतसंस्थेच्या कार्यालयात आणून दिले. पाकिटात साडेपाच हजार रुपये आणि अन्य कागदपत्रे होती. त्यामध्ये आधारकार्ड व शिवशाही बसचे आरक्षित तिकीट सापडले. त्यावरून खेडेकर यांनी एसटी आगारात चौकशी करत त्यांचा संपर्क क्रमांक मिळवला. संबंधितांशी संपर्क साधून पाकीट मिळाल्याचे कळवले. त्यानंतर हे पाकीट सखाराम भोसले यांना राजवैभव पतसंस्थेत ताब्यात देण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल भोसले यांनी जाधव यांचे आभार मानले.