सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे या आणि यासारख्या एकसेएक आणि तोडीसतोड क्रिकेटपटू घडवणारे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या जंयतीनिमित्ताने आज 3 डिसेंबर रोजी त्यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. दादर येथील शिवाजी महाराज पार्क मैदानातील गेट क्रमांक 5 येथे हे स्मृती स्मारक उभारण्यात आलं आहे. दिग्गज क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्मारकाचे सल्लागार मनसेप्रमुख यांनी या स्मारकाचं अनावरण केलं. यावेळेस माजी क्रिकेटपटू आणि सरांचे शिष्य प्रवीण आमरे, विनोद कांबळी आणि क्रिकेट चाहते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी स्मारकाचं अनावरण केल्यांनतर उपस्थितांना संबोधित केलं. राज ठाकरे यांनी यावेळेस आचरेकर सरांचा पुतळा उभारण्याऐवजी स्मृती स्मारकच का उभारलं? या मागचं कारण सांगितलं.
“मला इथे आचरेकर सर यांचा पुतळा नको होता. आपल्याकडे पुतळे खूप झाले आहेत. त्यामुळे वेगळं काही करायंच ठरवलं, ज्यातून आचरेकर सरांची खरी ओळख मुलांना समजेल. त्यामुळे स्टंप्स, पॅड्स, ग्लोव्हज, बॉल, हेल्मेट आणि त्या बॅटवर आचरेकर सरांची टोपी,अशा स्वरुपाचं सर्वसमावेशक स्मृती स्मारक करण्याचं ठरवलं. कॅप ही आचरेकर सरांची ओळख होती”, असं राज ठाकरे म्हणाले.