मुंबई : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या अनावरण प्रसंगाच्या निमित्तानं त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू एकत्र आले होते. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील गेट 5 नंबर जवळ स्मारकाची उभारणी करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बलविंदरसिंग सिंधू, संजय बांगर, विनोद कांबळी यांच्यासह इतर दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर मंचावर गप्पा मारत उभे होते. यावेळी विनोद कांबळी देखील मंचावर आला. विनोद कांबळी मंचावर आलेला पाहताच सचिन तेंडुलकरनं राज ठाकरे यांच्यासोबतची चर्चा थांबवली. राज ठाकरेंच्या परवानगीनं सचिन तेंडुलकरनं विनोद कांबळी जवळ जात त्याची विचारपूस केली. सचिन तेंडुलकर सोबतच्या भेटीनं विनोद कांबळी देखील आनंदी झाल्याचं पाहायला मिळाली. दोघांनी गळाभेट घेतल्याचं पाहायला मिळालं.
राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटलं की क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांना क्रिकेटचं मॅन्युअल म्हटलं जायचं. कारण त्यांनी क्रिकेटची बाराखडी शिकवली.मुंबई क्रिकेटच्या तीन पिढ्या रमाकांत आचरेकर यांनी घडवल्या, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी रमाकांत आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंना दिशा दाखवली, असं म्हटलं. सरांनी केवळ क्रिकेटपटूच नाही गुणी प्रशिक्षकांची फौज निर्माण केली.रमाकांत आचरेकर उत्तम माणूस होते, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
रमाकांत आचरेकर यांचं स्मारक यापूर्वीच व्हायला हवं होतं, असं राज ठाकरे म्हणाले. जगात आचरेकर सरांनी भारतासाठी जेवढे खेळाडू तयार केले तितके खेळाडू इतरांनी तयार केले असं वाटत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
आपल्याकडे सर्वात मोठा रस्ता आहे दादर टी टी त्याचं नाव महात्मा गांधी रस्ता आहे. पण, महात्मा गांधी यांचे गुरु होते त्यांच्या नावावर असलेला गोखले रोड किती मोठा आहे ? आपल्याकडे गुरुला तितकसं महत्त्व दिलं जात नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
रमाकांत आचरेकर सरांनी कधीच वेल प्लेड म्हटलं नव्हतं. आम्ही चुका सुधारु शकलो तर पुढं जाऊन काही तरु करु शकतो, असा विचार ते करायचे, असं सचिन तेंडुलकरनं म्हटलं. यावेळी सचिन तेंडुलकरनं रमाकांत आचरेकर सरांच्या इतर आठवणी सांगितल्या.
इतर बातम्या :
अधिक पाहा..