Latest Marathi News Updates Live : हिरानंदानीत पवई डेल्टा बिल्डिंगला शॉर्टसर्किटमुळं आग
esakal December 04, 2024 12:45 AM
Mumbai Live : हिरानंदानीत पवई डेल्टा बिल्डिंगला शॉर्टसर्किटमुळं आग

हिरानंदानीमधील पवई डेल्टा या बिल्डिंगला आज दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळं बिल्डिंगला लागली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Amritsar Live: अमृतसर एक्सप्रेसमध्ये बॉम्बची अफवा

अमृतसर एक्सप्रेसमध्ये बॉम्बची अफवा पसरली होती. याबाबत रेल्वे कंट्रोल रूमला धमकीचा फोन आला होता. अमृतसर एक्सप्रेसच्या लगेज डब्यात तिरुपती टॉईज लिहलेल्या दोन पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये स्फोटक असल्याची माहिती देण्यात आली होती. रफिक शेख नावाच्या इसमाने कॉल केला असल्याचे समजत आहे. पण गाडीच्या तपासणीअंती अफवा असल्याच स्पष्ट झाले.

Nana Patole Live: ईव्हीएम संदर्भात नाना पटोले दिल्लीत दाखल

ईव्हीएम संदर्भात नाना पटोले दिल्लीत दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे शिष्टमंडळ देखील त्यांच्यासोबत आहे.

Taj Mahal Live: जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी

आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. तसा धमकीचा मेल उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला आला आहे. त्यामुळे ताजमहलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस आणि सीआयएसएफकडून ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली आले. तसेच धमकीचा मेल कुणी पाठवला याबाबतचा शोध सुरू आहे.

दाचीगाम जंगलात चालू ऑपरेशनमध्ये दहशतवादी ठार

दाचीगाम जंगलात चालू ऑपरेशनमध्ये गगनगीर, गंदरबल आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या हत्येत सामील असलेला जुनैद अहमद भट हा दहशतवादी ठार : जम्मू काश्मीर पोलीस

Eknath Shinde Live : एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघाले

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघाले.

Mumbai Live: भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण

- देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रण

- भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण

- निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश

Mumbai Live: महायुतीच्या शपथविधी समारंभात १७ ते २५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता सूत्रांची माहिती

- गुरुवारी आझाद मैदानावर तिन्ही पक्षातील अंदाजे १७ ते २६ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ

- प्रधान नरेंद्र मोदी याच्या उपस्थितीत राज्यातील मंत्री घेणार शपथ

-राज्याचे हिवाळी अधिवेशन लवकर होणार असून, त्या अनुषंगाने मंत्री पदाचे वाटप होणार

- मंत्री कोण आणि कोणाच्या वाटेला किती खाती येणार ? याबाबत अद्याप स्पष्टता नाही

Mumbai Live: मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे

- ईव्हीएमचा मुद्दा तर आहे मात्र त्याबाबत आम्ही बघू तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा

- निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका

- पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा

Mahayuti Oath Ceremony Live: शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक

 निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यातच महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडत आहे. बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित आहेत. तर  पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी देखील बैठकीला उपस्थित आहेत.

Drumstick Price Hike Live: ऐन थंडीत शेवगा महागला; किलोला ६०० चा भाव, शेतकऱ्यांना फटका

बंगालच्या उपसागरात धडकलेल्या चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रालाही फटका बस्तान दिसतोय, पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांवर साठवणुकीतला शेतमाल विकण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसला आहे. शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. पण मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी किलोमागे शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही शेवग्याकडे पाठ फिरवली आहे.

Eknath Shinde Live: एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल

मागच्या चार दिवसांपासून एकनाथ शिंदेची प्रकृती खालावलेली आहे. दरे गावामध्ये बिघडलेली तब्येत ठाण्यात आल्यानंतरही सुधारलेली नाही. आता त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत.

Mumbai Live: बांद्रा येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
  • मुंबईतील बांद्रा येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली

  • लाखो लिटर पाणी वाया गेले

  • दक्षिण मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी पाणीपुरवठा करणारी लाईन फुटली

  • यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे

  • ती लाईन फुटून जवळपास 20 ते 25 मिनिटे झाले असून महा नगरपालिकेकडून अद्याप लाईन दुरुस्त करण्यात आलेली नाही

Uddhav Thackeray Live: उद्धव ठाकरेंनी बोलावली माजी नगरसेवकांची बैठक

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गट महानगरपालिकेच्या तयारीला लागल्याचं दिसून येतंय. मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक आहे. सर्व नगरसेवकांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीतील वार्डनिहाय माहिती देखील घेतली जाणार आहे.

BJP Meeting Live: भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज मुंबईत येणार

भाजपचे केंद्रीय निरिक्षक आज सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईत येणार आहेत. विजय रुपाणी सायंकाळी ७.३० वाजता, तर निर्मला सीतारामन रात्री ९.३० वाजता पोहोचणार आहेत. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये दोघे नेते वास्तव्यास असतील. दोन्ही निरिक्षक उद्या भाजप आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजप विधीमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे.

eknath shinde live: भरत गोगावले यांनी घेतली शिंदेंची भेट

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भरत गोगावले यांनी भेट घेतली आहे. शिंदेच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांमध्ये संधी मिळावी, यासाठी ही भेट होती, असं बोललं जातंय.

महाजन, मुंडे, शिरसाट एकत्रित कार्यक्रम स्थळाची पाहाणी करणार

५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यापूर्वी शिवसेनेची नाराजी दिसून आलेली होती. मात्र आता महायुतीचे नेते एकत्रितपणे कार्यक्रम स्थळाची पाहाणी करणार आहे. गिरीश महाजन, धनंजय मुंडे, संजय शिरसाट हे एकत्रित आझाद मैदानाची पाहाणी करणार आहे.

Adani Live: संसदेत अदाणी मुद्यावर विरोधकांनी जोरदार निदर्शनं

संसदेच्या मकरद्वारावर अडाणी मुद्यावर विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली. खासदारांनी "मोदी अदाणी एक हैं" असा बॅनर घेऊन आपल्या निषेधाची भावना व्यक्त केली. या निदर्शनांमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह INDIA आघाडीतील अनेक खासदार सहभागी झाले होते. विरोधकांनी अडाणी प्रकरणावरून मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे, तर सरकारने या मुद्यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही.

Shiv Sena live: नव्या सरकारच्या मंत्री मंडळ विस्तारात शिवसेना सक्रिय

नव्या सरकारच्या मंत्री मंडळ विस्तारात शिवसेना सक्रिय झाली आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आझाद मैदानात भाजप नेत्यांसोबत पहाणी करण्यासाठी पोहचणार आहेत. मंत्री मंडळ विस्तारात शिवसेना अलिप्त राहिल्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या होत्या, मात्र गुलाबराव पाटील यांच्या या पहाणी दौऱ्यामुळे सर्व शंका पुर्णविरामाला पोहचल्या आहेत.

ajit pawar live: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग

नवी दिल्लीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदार संघाचे आमदार किरण लहामटे हे प्रफुल पटेल यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी अजित पवार देखील दिल्लीत उपस्थित आहेत आणि पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा केली जात आहे.

BJP LIVE: भाजपाने बंजारा समाजाच्या आमदाराना मंत्रिपद द्यावे ; माजी खासदार हरिभाऊ राठोड

गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे ,भारतातील इतर राज्यातील बहुतांशी वंजारा समाज यापूर्वीच भाजपाकडे वळलेला आहे २०२४ च्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरएसएस च्या नियोजनबद्ध 'गोधरी कुंभ 'आणि 'संत सेवालाल महाराज लभान बंजारा समृद्धी तांडा योजने'मुळे बंजारा समाजाने भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे.

Eknath Shinde live: एकनाथ शिंदे विरोधी पक्षात? अंजली दमानिया यांचा ट्विटरवर सवाल

अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एक कडवट टीका केली आहे, ज्यात त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले आहे की, "विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचाच कट आहे." दमानिया यांनी दावा केला की भाजप सत्ता मिळवून विरोधी पक्षांचे अस्तित्वही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. "सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच," अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या मते भाजपची ही स्क्रिप्ट अशीच आहे: "गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे आणि पुन्हा बरं न वाटणे." यावरून दमानिया यांनी भाजपच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Sugarcane Price LIVE : ऊसदरप्रश्नी तोडग्यासाठी शिरोळमध्ये आज बैठक

शिरोळ : ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी ऊस दरासंदर्भात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच राहिले. दरम्यान, तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी या आंदोलनाची दखल घेत तोडगा काढण्याकरिता प्रयत्न केले. यामुळे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांनी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची व ‘आंदोलन अंकुश’ची बैठक मंगळवारी (ता. ३) दुपारी तीन वाजता शिरोळ येथे बोलावली आहे. यामुळे या बैठकीत कोणता तोडगा निघणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Mumbai Sessions Court LIVE : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 26 आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सर्व २६ आरोपींना गुन्हे शाखा मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का कोर्टात हजर करणार आहे. कोर्टात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीची गुन्हे शाखा मागणी करण्याची शक्यता आहे. मोक्का लावण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Jaysingpur Buddhist Council LIVE : जयसिंगपुरात 15 डिसेंबरला बौद्ध धम्म महापरिषद

जयसिंगपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या वतीने ३४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषद रविवारी (ता. १५) आयोजित करण्यात आली आहे. धम्म परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राज्य सचिव भदंत डॉ. उपगुप्तजी महास्थवीर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भदंत प्रा. डॉ. यशकाश्यपायन महास्थवीर, भदंत प्रा. डॉ. एम. सत्यपाल महास्थवीर, भदंत प्रज्ञाशील महास्थवीर, भदंत करुणानंद स्थवीर, आर. आनंद स्थवीर, भदंत संबोधी, भिक्खूणी माताजी बुद्धकन्याजी थेरी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Markadwadi Voting LIVE : मारकडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान, प्रशासनाकडून जमावबंदी

Markadwadi Voting : सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये आज ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. गावातील मतदान भाजपच्याच बाजूने गेल्यामुळे ग्रामस्थांनी बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. गावकऱ्यांकडून सर्व तयारी करण्यात आलीये. प्रशासनाकडून या मतप्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. गावात पाच डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Tamil Nadu Rain LIVE : तिरुवन्नमलाईत घरावर कोसळली दरड; 5 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

तामिळनाडू : तिरुवन्नमलाई येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे घरावर दरड कोसळल्याने 5 मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Ajit Pawar LIVE : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह-अजित पवारांची काल रात्री भेट नाहीच!

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांची काल रात्री भेट झालीच नाही. गृहमंत्री अमित शाह काल रात्रीच चंदिगढला रवाना झाले आहेत. भारतीय दंड संहिता संदर्भातील आयोजित संमेलनात शाह सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन करतील.

Congress Delegation LIVE : काँग्रेसचं शिष्टमंडळ आज सायंकाळी 5 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची घेणार भेट

नवी दिल्ली : काँग्रेसचं शिष्टमंडळ आज सायंकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निकालाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत, त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे.

Mahayuti Government LIVE : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? उद्या गूढ उलगडणार

Latest Marathi Live Updates 3 December 2024 : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याचे गूढ येत्या बुधवारी (ता.४) उलगडणार असून त्याच दिवशी भाजपच्या नव्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्यानं दिलीये. तर, दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार भूषवणार आहेत. काँग्रेसचं शिष्टमंडळ आज सायंकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. तसेच सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये आज ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.