आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2025 साठी अजून काही महिने बाकी आहेत. मात्र अंतिम फेरीसाठी आतापासूनच टीम इंडियासह काही संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पर्थ कसोटीत पराभूत करत अव्वल स्थान कायम ठेवलं. तर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला लोळवलं. दक्षिण आफ्रिकेने यासह मोठी झेप घेतली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला फटका बसला आणि त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. या निकालानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशात आयसीसीने 2 संघांवर मोठी कारवाई करत दणका दिला आहे. त्यामुळे त्यातील एका संघाचा डब्ल्यूटीसी फायनलचा प्रवास हा संपल्यात जमा झाला आहे. आयसीसीने 2 संघांचे पॉइंट्स कापले आहेत.
आयसीसीने न्यूझीलंड आणि इंग्लंडला दणका दिला आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात दोन्ही संघांना ओव्हर रेट राखता आला नाही. अर्थात दोन्ही संघांनी संथ बॉलिंग केली. ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर चौथ्याच दिवशी (2 डिसेंबर) 8 विकेट्सने विजय मिळवला. मात्र स्लो ओव्हर रेटमुळे या दोन्ही संघाचे प्रत्येकी 3 पॉइंट्स कापण्यात आले आहेत. तसेच दोन्ही संघांना सामन्यातील एकूण मानधनाच्या 15 टक्के इतकी रक्कम म्हणून दंड द्यावी लागणार आहे.
आयसीसीच्या या कारवाईमुळे इंग्लंड-न्यूझीलंडला मोठा फटका बसलाय. मात्र इतर संघांना पॉइंट्स टेबलमध्ये पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंड अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मात्र न्यूझीलंडला जर तर अशी किंती संधी होती. मात्र आता आयसीसीच्या कारवाईनंतर न्यूझीलंडचं जर-तरचं समीकरणही फिस्कटलंय. न्यूझीलंडची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तर श्रीलंका चौथ्या स्थानी पोहचली आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंडवर मोठी कारवाई
आयसीसीच्या या निर्णयाआधी न्यूझीलंडचे 50 पीसीटी पॉइंट्स होते. मात्र आता तेच पीसीटी पॉइंट्स हे 47.92 इतके झाले आहेत. त्यानंतर आता न्यूझीलंडने या डब्ल्यूटीसी 2023-2025 साखळीतील उर्वरित 2 सामने जिंकले तरीही पीसीटी पॉइंट्स जास्तीत जास्त 55.36 इतके होतील. हे पीसीटी पॉइंट्स अंतिम फेरीसाठी पुरेसे ठरणार नाहीत.