विनोद कांबळीला इच्छा असूनही सचिनला मिठी मारता आली नाही, पाहा व्हायरल व्हीडिओ
GH News December 04, 2024 02:06 AM

क्रिकेटच्या मैदानात एकेकाळी गाजलेली जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोडी मैदानात असली की भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. दोघेही रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात नावलौकीक मिळवत गेला. तर विनोद कांबळी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. पण दोघांची नाळ ही क्रिकेट आणि आचरेकर सरांच्या शिकवणीशी जुळून होती. सचिन तेंडुलकर याने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. तर विनोद कांबळी आपल्या खराब खेळामुळे 1996 वर्ल्डकपनंतर आत बाहेर राहिला. 2000 सालानंतर विनोद कांबळी क्रिकेटच्या मैदानात दिसेनासा झाला. पण सचिन आणि कांबळीची मैत्री आजही कायम आहे.

सचिन आणि कांबळी या दोघांचा आज सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचा योग जुळून आला. आचरेकर सरांच्या स्मारकामुळे हे शक्य झालं. पण सर्वांच्या नजरा या सचिन आणि कांबळीच्या भेटीकडे लागल्या होत्या. झालंही तसंच. सचिन व्यासपीठावर चढताच त्याची पहिली नजर पडली ती आपल्या मित्राकडे. सचिनने क्षणाचाही विलंब न लावता विनोदकडे गेला आणि त्याची विचारपूस केली. सचिन-विनोदच्या भेटीचं दृष्य कॅमेऱ्यात कैद झालं. विनोद कांबळीने सचिनचा हात हातात घेऊन एक भक्कम पार्टनरशिप केल्याचं भास करून दिला.आचरेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरणानिमित्ताने हे दोन्ही जुने मित्र एका व्यासपीठावर आले होते.

सचिन, कांबळी, प्रवीण आमरे, पारस म्हाम्ब्रे यासारखे गुणवान खेळाडू घडवणारे महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं मुंबईतील शिवाजी महाराज पार्क मैदानात अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांच्या 92 व्या जयंतीनिमित्ताने स्मारकांचं अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांचा लाडक्या आणि सर्वोत्तम शिष्यांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांचं हे स्मारक शिवाजी महाराज पार्कमधील गेट नंबर 5 च्या इथे उभारण्यात आलं आहे.

व्हायरल व्हीडिओत काय?

सचिन मंचावर बसवलेल्या विनोद कांबळीच्या दिशेने गेला. सचिनने विनोदची विचारपूस केली. मात्र या दरम्यान विनोद भावूक झालेला दिसून आला. व्हायरल व्हीडिओत,  खुर्चीवर बसलेल्या विनोदला उठून सचिनला मिठी मारायची इच्छा दिसत होती. त्यासाठी विनोद सचिनचा हात धरुन उठायचा प्रयत्न करत होता. मात्र कांबळीला काही उठता आलं नाही. तसेच सचिन आणि कांबळी या दोघांमध्ये नक्की काय संवाद झाला? याबाबत अजून काहीही समजू शकलेलं नाही.

दरम्यान विनोद कांबळीची गेल्या अनेक महिन्यांपासून तब्येत ठीक नाहीय. कांबळीला स्वत:च्या पायावरही निट उभ राहता येत नाही. कांबळीचा काही महिन्यांपूर्वी ऑगस्ट 2024 मध्ये एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओत कांबळीला स्वतं:च्या पायवर निट उभही राहता येत नव्हतं. कांबळी या व्हीडिओत दुचाकीच्या आधार घेत असल्याचं दिसत होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.