गुन्हेगाराला वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलला का? जितेंद्र आव्हाडांचा
Marathi December 21, 2024 06:24 PM

नागपूर: संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री सोबत असेल तर वाल्मिक कराडला अटक करण्याची हिंमत कोण दाखवणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला. यावेळी त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबाबातही पुन्हा एकदा संशय व्यक्त केला. अंधाराची चिरफाड करून सत्य आले पाहिजे होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उत्तरात ते आलेले नाही. परभणीतला सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू कसा झाला? त्याचा रिपोर्ट मी वाचला, त्यात त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, त्या जखमा आल्या कुठून? हाड मोडल्यामुळे त्याला झटका आलाय. याची उत्तरं कोण देणार? गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आपण रिपोर्ट बदलत आहोत का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांसाठीच्या डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर हल्ला चढवला. ठाण्यात डम्पिंग ग्राउंड नसल्याने आम्ही जागा शोधत आहोत.  ती कुणाची तरी असते अवैधरित्या , तो कचरा सुकला की मग तो जाळला जातो, त्याने धूर तयार होतो. राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे होते पण आम्ही 40 वर्षात डम्पिंग ग्राउंड तयार करू शकलो नाही. प्रदूषण मंडळ झोपले आहे की फक्त वसुली करणे एवढं काम उरलंय. पालिका लक्ष देत नसेल तर सरकारने तरी लक्ष द्यावे. ठाण्यात कचऱ्यात पैसा खाण्याची जी सवय लागलीय ती सुटत नाही. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. ठाण्याचा डीपी प्लॅन बदलला आहे. ठाण्यातील काही लीगल सोसायटीमध्ये आरक्षण दाखवलं आहे. कळव्यात 450 इमारती उद्ध्वस्त करणारा डीपी प्लॅन आहे. ठाण्यात एक मोठा बिल्डर आहे तो आता कळव्यात आहे. त्या बिल्डरने एक बिल्डिंग बांधलीय, त्याला नसलेल्या रस्त्याची परवानगी दिलीय. अख्खं शहर तुम्ही विकत आहात का? या शहरात माणसं राहतात, जनावरं नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता; सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा दावा

शरद पवार यांनी शनिवारी परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने माझ्या मुलाला कोणताही आजार नसल्याचे शरद पवार यांना सांगितले. माझ्या मुलाचा जीव घेणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी सोमनाथच्या आईने गेली. यानंतर शरद पवार यांनी म्हटले की, सोमनाथच्या कुटुंबांचे म्हणणे आणि विजय वाकोडे यांच्या मृत्यूबाबत चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी, असे शरद पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

शरद पवारांनी मस्साजोगमध्ये पाऊल ठेवताच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, गावकरी म्हणाले….

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.