नाशिकच्या सह्याद्रीची घौडदौड, परदेशी कंपन्यांची 390 कोटींची नवीन गुंतवणूक, शेतकऱ्यांना फायदा
Marathi December 21, 2024 10:25 PM

सह्याद्री फार्म गुंतवणूक: नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून एकत्रित येत स्थापन झालेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यसर कंपनी दिवसेंदिवस मोठ प्रगती करत आहे. या कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लि. या कंपनीमध्ये रिसपॉन्सअबिलीटी (युरोप) व जीईएफ (अमेरिका) या कंपन्यांनी 390 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या समवेत एफ.एम.ओ (FMO), प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या सध्याच्या गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. या गुंतवणूकीचा उपयोग पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांच्या जातींच्या लागवड क्षेत्र विस्तारासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ व मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात येईल.

सह्याद्री फार्म्स फळे आणि भाजीपाल्याच्या पुरवठा साखळीमध्ये कार्यरत आहे. प्रामुख्याने दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करणे, प्राथमिक प्रक्रिया तसेच इतर मूल्यवर्धन करून उत्पादने प्रमुख आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याचे कार्य सह्याद्री फार्म्समध्ये केले जाते. जवळपास, 25000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उत्पादने घेतली जातात. या कंपनीमध्ये  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया सुविधांमुळे टेस्को, एडेका, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि कोका-कोला यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची उत्पादने पुरवली जातात.

सह्याद्री फार्म्सकडून द्राक्ष व लिंबुवर्गीय पीकांच्या नवीन वाणांची आयात

बदलत्या व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असते. अनेक फळांमधील जुनी वाणे ही बदलत्या हवामानात आता तग धरू शकत नाही. तसेच ग्राहकांच्याही आवडी-निवडी बदलल्या आहेत. हे लक्षात घेऊन सह्याद्री फार्म्सने द्राक्ष व लिंबुवर्गीय पीकांच्या नवीन वाणांची आयात केली. याकरीता ग्रापा, ब्लूमफ्रेश, ITUM आणि यूरोसेमिलास यांसारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वाण निर्मिती करणाऱ्या कंपन्यासोबत भागीदारी केली आहे. यामुळे देशाच्या फलोत्पादन क्षेत्राला लाभ होईल व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या उत्पादनांचा हिस्सा वाढविण्यास मदत होणार आहे. शेती क्षेत्रातील महिलांचे लक्षणीय योगदान लक्षात घेऊन सह्याद्री फार्म्समध्ये सर्वच पातळ्यांवर महिलांचा सक्रिय सहभाग घेण्यावर भर देण्यात येत आहे. पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीवर लक्ष केंद्रित करताना मातीच्या आरोग्यापासून कार्बन फूट प्रिंट कमी करण्यावर सह्याद्रीमध्ये भर दिला जातो. याकरीता पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्याकरीता या गुंतवणूकीचा वापर केला जाईल.

25 हजारांपेक्षा जास्त उत्पादक शेतकरी सह्याद्री फार्म्सला जोडलेत

सन 2010 मध्ये विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही मोजके द्राक्ष उत्पादक एकत्रित आले. सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून द्राक्ष निर्यातीचे काम सुरू केले. पुढच्या टप्प्यावर या कंपनीने इतर फळपीकांमध्ये तसेच प्रक्रिया उत्पादनांवर काम करून जगाच्या विविध बाजारपेठेत आपली ओळख निश्चित केली. एकात्मिक मूल्यसाखळीच्या माध्यमातून आपला व्यवसाय विस्तार करण्यात कंपनीला अल्पावधीतच यश आले. सर्व ठिकाणी तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर केला जात आहे. आज 25 हजारांपेक्षा जास्त उत्पादक शेतकरी सह्याद्री फार्म्सला जोडले गेले आहेत. यामुळेच 40 पेक्षा जास्त देशांच्या बाजारपेठेत कंपनीची उत्पादने विक्री करता येतात. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये सह्याद्री फार्म्सने 310 कोटींची गुंतवणूक मिळवण्यात यश मिळविले होते. त्यावेळी एफ.एम.ओ(FMO), प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या संस्थांनी गुंतवणूक केली होती. गुंतवणूकीच्या दुसऱ्या फेरीतही हे गुंतवणूकदार आहेत.

शेतकऱ्यांच्या कामावर व दर्जेदार उत्पादनांवर गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला

सह्याद्रीच्या शेतकऱ्यांच्या कामावर व दर्जेदार उत्पादनांवर गुंतवणूकदारांनी परत एकदा विश्वास दाखविलेला आहे.हा विश्वास अधिक सार्थ करीत गेल्या दोन वर्षात कंपनीने आपले उत्पन्न दुप्पटीने वाढविले आणि मार्च 2024 अखेर 1482 कोटींपर्यंत मजल मारत चांगला नफादेखील मिळवला. नव्याने आलेल्या या गुंतवणूकीमुळे पुढील पाच वर्षातील वार्षिक वाढीचा वेग सुमारे 40 टक्के एवढा राहण्याचा अंदाज आहे.

कंपनीचा आयपीओ आणण्याचे सह्याद्री फार्म्सचे नियोजन

नजीकच्या काळात कंपनीचा आयपीओ आणण्याचे सह्याद्री फार्म्सचे नियोजन आहे. शेअर बाजारात नोंदणी होणारी शेतकऱ्यांच्या मालकीची पहिला कंपनी अशी ओळख या निमित्ताने सह्याद्री फार्म्सला मिळेल. यातून 11000 शेतकरी भागधारकांची संपत्ती वाढणार आहे. छोटे आणि अल्प-भूधारक शेतकरी एकत्रित येऊन कुठपर्यंत मजल मारू शकतात, याचे हे अनोखे उदाहरण देशाच्या कृषी क्षेत्राला आत्मविश्वास देणारे असेल.

देशाच्या कृषी क्षेत्राकडे उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीकोनाने पाहणे व शेतकऱ्यांनी उद्योजकाप्रमाणे शेती व्यवसाय करावा, या दिशेने आणि एकीचे महत्व ओळखून आम्ही सह्याद्री फार्म्समध्ये अनेक वर्षे काम करीत असल्याचे मत सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले. यामुळेच आज फलोत्पादन क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी शेतकऱ्यांची कंपनी म्हणून आम्ही सह्याद्रीची ओळख तयार करू शकलो. या प्रवासात आमच्या सोबत असणारे शेतकरी, कर्मचारी, ब्रीडर भागधारक, ग्राहक व गुतंवणूकदार अशा सर्वांचे आम्ही आभार मानतो. तसेच भारतीय शेती क्षेत्रात सह्याद्रीच्या माध्यमातून  गुंतवणूक करणारे आमचे नवीन गुंतवणूकदार  रिसपॉन्सिबिलीटी व जीईएफ यांचेदेखील आभार मानतो. नजीकच्या काळात शेअर बाजारात (IPO) येण्याच्या दिशेने कडे वाटचाल करत असून भारतात शेअर बाजारात येणारी  पहिली शेतकरी-मालकीची कंपनी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यातून देशातील शेतकऱ्यांना निश्चितच उर्जा मिळेल, हा विश्वास असल्याचे विलास शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मालकीची एकूण 700 कोटींची गुंतवणूक

जवळपास 15 वर्षांपूर्वी आम्ही मोजके द्राक्ष उत्पादक शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र आलो. नेतृत्वावर विश्वास ठेवणे आणि प्रदिर्घ वाटचालीची तयारी यातून आज आम्ही या टप्प्यावर पोहचलो असल्याचे मत  सह्याद्री फार्मर्स प्रोड्यसर कं.लि संचालक रामदास पाटील म्हणाले. आज झालेली 390 कोटी व यापूर्वीची 310 कोटी अशी एकत्रित 700 कोटींची गुंतवणूक शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीत होऊ शकते, हा आमच्यासाठी खूप आनंददायी क्षण आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष कसे घडले, याचे आम्ही साक्षीदार आहोत. हे राज्यात-देशात इतरत्रही घडू शकणार आहे. छोट्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ही वाट निष्ठेने चालायला पाहिजे असे रामदास पाटील म्हणाले.

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.