दिलीप बार्शीकर
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ‘एलआयसी’ने ‘विमा सखी’ ही एक अभिनव योजना आणली आहे. ही कोणतीही पॉलिसी नाही, तर महिला सक्षमीकरणासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यात सहभागी होऊन महिला ‘विमा एजंट’ म्हणून काम करू शकणार आहेत. या योजनेचा आरंभ नऊ डिसेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.
पात्रता आणि प्रशिक्षण
या तीन वर्षांच्या योजनेत १८ वर्षे पूर्ण झालेली आणि किमान एसएससी उत्तीर्ण झालेली कोणतीही भारतीय महिला ‘विमा सखी’ म्हणून सहभागी होऊ शकेल. इच्छुक महिलेने अर्जासह वयाचा, निवासाचा, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणे आवश्यक आहे. पात्र महिलांना आठवडाभराचे (२५ तास) प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येईल, त्यानंतर त्यांची एक परीक्षा घेतली जाईल.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महिलांची करिअर एजंट (विमा सखी) म्हणून नियुक्ती होईल. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्विमा पॉलिसी विक्रीचा व्यवसाय सुरू करतील. यासाठी २५ तासांचे प्राथमिक प्रशिक्षण व परीक्षेत उत्तीर्ण होणे या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत.
मिळणारे विविध लाभ
विमा सखींनी केलेल्या आयुर्विमा विक्रीच्या व्यवसायाबद्दल त्यांना नियमांप्रमाणे कमिशन, तर मिळेलच; त्याचबरोबर पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये असे विद्यावेतनही (स्टायपेंड) मिळेल. अर्थात, या काळात दिलेल्या उद्दिष्टांनुसार त्यांनी नव्या पॉलिसींची विक्री करणे अपेक्षित आहे.
या काळात त्यांना आवश्यकतेनुसार वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल; तसेच संभाषणकला, विक्री कौशल्य, विम्याच्या विविध योजना आदींबाबतही विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला स्वतंत्रपणे आयुर्विमा सल्लागार म्हणून काम करू लागतील. विमाविक्रीत विशेष कामगिरी बजाविणाऱ्या महिलांना विविध क्लबचे सदस्यत्व आणि त्याचबरोबर मिळणारे भरघोस आर्थिक लाभही मिळतील. पदवीधर महिलांना, विकास अधिकारी म्हणूनही काम करण्याची संधी मिळेल.
सध्या बेरोजगार असणाऱ्या; परंतु, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कामाचे तास लवचिक असल्यामुळे गृहिणींसाठी हे एक वरदानच आहे. या योजनेबाबतची अधिक माहिती www.licindia.in या वेबसाइटवरून अथवा जवळच्या एलआयसी कार्यालयातदेखील मिळू शकेल.