भगवान खैरनार, मोखाडा: राज्यात महायुतीने पुन्हा सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. मंत्र्यांचा शपथविधी होऊन आठ दिवस 39 मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून राहावे लागले आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी खातेवाटप केले आहे. मात्र, पालकमंत्र्याचा तिढा कायम राहिला आहे.
पालघर जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही त्यामुळे जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आता जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक पालकमंत्री मिळण्याची प्रतिक्षा महायुतीचे पदाधिकारी आणि मतदारांना लागली आहे. मागील पंचवार्षिकपासून पालघर जिल्हाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली नाही. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजुने मतदारांनी कौल दिला आहे.
जिल्ह्यातील सहा पैकी पाच विधानसभेच्या जागा मतदारांनी महायुतीच्या पारड्यात टाकल्या आहेत. त्यामुळे यावेळी जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती. मात्र, एकाही आमदाराच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली नाही. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये नाराजीचा सूर ऊमटला आहे. तब्बल महिनाभरानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले. मात्र, मंत्र्यांच्या शपथविधी नंतर आठ दिवस आपल्याला कोणते खाते मिळणार याची मंत्र्यांना वाट पहावी लागली आहे.
खाते मिळाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांच्या परिसरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात नैराश्याचे वातावरण आहे. पालघरचे शिवसेना आमदार राजेंद्र गावीत यांना मंत्रीपद मिळावे म्हणून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार मागणी केली होती. तसेच भाजपकडून स्नेहा दुबे पंडित आणि हरिश्च॔द्र भोये यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भाजप पदाधिकारी आग्रही होते. यावेळी ही पुन्हा पालघरचे मंत्रीपद हुकल्याने, पालकमंत्री पदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे.
मंत्र्यांचे आठ दिवसानंतर खाते वाटप झाले आहेत. मात्र, पालकमंत्री पदाचा महायुतीतील तिढा कायम राहिला आहे. कोणत्या मंत्र्यांला, कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार याकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्याचे डोळे लागले आहेत. पालघरच्या शहरी, बंदरी आणि आदिवासी भागाची माहिती आणि जाणं असलेल्या मंत्र्यांला पालकमंत्री पद मिळावे अशी मागणी महायुती च्या पदाधिकाऱ्याकडून केली जात आहे. त्यातही पालकमंत्री पदासाठी भाजप चे पदाधिकारी जास्तच आग्रही आहेत.
पालघरमधून एकाही आमदाराला मंत्रीमंडळात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आदिवासी भागाच्या विकासासाठी, येथील समस्यांची जाणं असलेल्या मंत्र्यांला पालघर चे पालकमंत्री पद मिळाले पाहीजे. तसेच पालघरचे पालकमंत्री पद हे भाजपच्याच मंत्र्याला मिळावे ही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रमुख आग्रही मागणी आहे, असं भाजप पालघर जिल्हा चिटणीस विठ्ठल चोथे यांनी सांगितलं आहे.