Shivshahi Bus fire in dhule: धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे शहरातून शिरपूरच्या दिशने जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागली. घटनेच्या वेळी शिवशाही बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. बसमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना तात्काळ बसमधून खाली उतरवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे शहर येथून शिरपूरच्या दिशेने शिवशाही बस निघाली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास बसने गोराने फाटा ओलांडल्यावर गाडीचा मागचा टायर फुटला. तसेच ऑईल सुद्धा लीक झाल्याने बसने पेट घेतला. बसच्या टायरला आग लागल्याचं बस चालकाच्या लक्षात येताच त्याने बसमधील प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले.
बसला लागलेली ही आग झपाट्याने वाढली आणि अवघ्या काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाहीये आणि मोठा अनर्थ टळला.
हे पण वाचा :
मुंबई - गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग
दुसरीकडे मुंबई - गोवा महामार्गावर कोलाडजवळ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका लक्झरी बसने पेट घेतल्याची घटना घडली होती. या बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. बोरीवली येथून मालवणच्या दिशेने लक्झरी बस निघाली होती. बस कोलाड जवळ आली असता कोकण रेल्वे पुलाजवळ बसच्या मागच्या बाजूने मोठा आवाज आला.
यानंतर बस चालकाने बस थांबवली. बस थांबवताच अचानक आग लागली. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते.
यानंतर धाटाव औद्योगिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे.